​अमळनेरात शिवजन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी; श्री मंगळग्रह मंदिर संस्थेतर्फे कलावंतांचा गौरव!

अमळनेर शहरात यंदाही सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण शहरात शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रशासकीय व सामाजिक पातळीवर तयारी पूर्ण झाली आहे.
​उत्सवासाठी नाट्यमंदिर परिसराची स्वच्छता करून तिथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विशेष पॉलिशिंग करून परिसर सुसज्ज करण्यात आला आहे. मिरवणुकीचा प्रारंभ प्रशासकीय पूजनाने होईल, ज्याला प्रांत अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, डीवायएसपी विनायक कोते, मुख्याधिकारी गणेश शिंदे आणि पीआय दत्तात्रय निकम उपस्थित राहणार आहेत.
​●सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल~
​शिस्तबद्ध मिरवणुकीत केवळ धार्मिक आणि प्रेरणादायी गाण्यांचा समावेश असेल. यात विविध शाळा व संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाईल.
​सायरादेवी बोहरा इंग्लिश स्कूलचे पथनाट्य,  पथकाचे  लेझीम, ​जीत स्टुडिओ, ​कन्हैया व रुबजी नगर ग्रुपचा नृत्याविष्कार, लाठी-काठी, तलवारबाजीची प्रात्यक्षिके, ​आदिवासी बांधवांचे ढोल पथक कला सादर करणार आहेत, 
​विशेष म्हणजे, अतिप्राचीन श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थेच्या वतीने 'ट्रॉफी' देऊन कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे.
​मिरवणुकीत ठिकठिकाणी  आजी-माजी सैनिक फाउंडेशनतर्फे नाश्ता,  नाट्यमंदिर येथे रणजित शिंदे यांच्यातर्फे 'शिवभोजन' तर विजय पाटील,  योगेंद्र बाविस्कर, आकाश परदेशी, राज लाड यांच्यातर्फे थंड पेय  वाटप होणार आहे. हनुमान चालीसा पठणावेळी 'किंग्स ऑफ किंग्स' ग्रुपतर्फे लाडू प्रसाद, तर भूषण चौधरी आणि निखिल चव्हाण यांच्यातर्फे पाणी व शरबत व्यवस्था करण्यात आली आहे.
​उत्सवाचे औचित्य साधून समितीने रक्तदान शिबिराचे-देखील आयोजन केले आहे. रक्तदात्यांना डीवायएसपी विनायक कोते व पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते 'स्कूल बॅग' देऊन सन्मानित करण्यात येईल. 
युवा मित्र परिवाराच्या सहकार्याने ही 'आदर्श शिवजयंती' साजरी करण्याचा संकल्प समितीने सोडला असून, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments