अमळनेरचा झेंडा आता दक्षिण आफ्रिकेत! शिक्षक ते 'इंटरनॅशनल रनर'; अॅड. चंद्रभान पाटील यांची 'कॉम्रेड मॅरेथॉन'साठी ऐतिहासिक निवड
अमळनेरच्या इतिहासात पाहिले अल्ट्रा रनर!
जिद्द, चिकाटी आणि अफाट मेहनतीच्या जोरावर माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा साध्य करू शकतो, याचे जिवंत उदाहरण अमळनेरचे अॅड. चंद्रभान पाटील यांनी जगासमोर ठेवले आहे. 'शिखर अकॅडमी' स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक आणि पेशाने शिक्षक ते वकील असा प्रवास करणाऱ्या पाटील यांनी आता आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून भरारी घेतली आहे. जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील 'कॉम्रेड मॅरेथॉन' (Comrades Marathon) धावण्यासाठी ते पात्र ठरले असून, असा मान मिळवणारे ते अमळनेरच्या इतिहासातील पहिले अल्ट्रा रनर ठरले आहेत.
टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये उमटवला ठसा
लोणावळा येथील सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्या आणि कठीण चढ-उतारांवर होणारी 'टाटा अल्ट्रा मॅरेथॉन' ही आशिया खंडातील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. ५० किमी अंतराची ही आव्हानात्मक शर्यत अॅड. पाटील यांनी अवघ्या ५ तासांत पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रशिक्षकाची (Coach) मदत न घेता स्वतःच्या नियोजनावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
धावण्याच्या क्षेत्रातील त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. अवघ्या एक वर्षात त्यांनी 'अल्ट्रा रनर' होण्याचा बहुमान मिळवला. त्यांच्या कामगिरीचा आलेख खालीलप्रमाणे आहे:
फुल मॅरेथॉन (४२ किमी): ३ तास ५५ मिनिटांत पूर्ण.
हाफ मॅरेथॉन (२१ किमी): आतापर्यंत ७ वेळा पूर्ण, ज्यामध्ये १ तास ४२ मिनिटे ही त्यांची सर्वोत्तम वेळ आहे.
वेगवान रनर: अमळनेरमधील सर्वात वेगवान धावपटू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
पुढील लक्ष्य: दक्षिण आफ्रिका आणि राजस्थानची 'बॉर्डर रन'
आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'कॉम्रेड मॅरेथॉन'साठी पात्र झाल्यानंतर आता त्यांचे लक्ष्य नोव्हेंबर २०२६ मध्ये राजस्थान येथे होणाऱ्या १०० किमी अंतराच्या 'बॉर्डर रन' कडे लागले आहे. शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक धैर्याची ही मोठी परीक्षा असणार आहे.
अमळनेरमध्ये अभिमानाचे वातावरण
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना अधिकारी बनवणारे पाटील सर स्वतः आता धावपट्टीवर 'हिरो' ठरले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अमळनेर शहरातून आणि क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वकिली, अध्यापन आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी घेतलेले कष्ट आज फळाला आले आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments