अमळनेर तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना’ अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत आमदारांनी प्रशासनाला कामात गती आणण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पानंद रस्ते हा होता. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते आणि शेतकऱ्यांना शेतात माल वाहून नेण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, या कामांचा आमदारांनी सखोल आढावा घेतला. ही कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
आगामी उन्हाळा लक्षात घेता तालुक्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवर बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी आमदारांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. विशेषतः: "टँकर मागणीचे प्राप्त झालेले किंवा येणारे सर्व प्रस्ताव केवळ ४ दिवसांच्या आत मंजूर करण्यात यावेत," असे आदेश आमदार अनिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यामुळे टँकर मंजुरीच्या फाईल्स प्रशासकीय पातळीवर अडकून न राहता, ग्रामस्थांना वेळेवर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बैठकीत महसूल, कृषी, बांधकाम, पंचायत समिती आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा (अमळनेर) व डॉ. उल्हास देवरे (पारोळा), तसेच दोन्ही तालुक्यांचे गटविकास अधिकारी व इतर विभागप्रमुखांनी आपल्या विभागाचा प्रगती अहवाल सादर केला. सर्व विभागांनी समन्वयातून कामे जलदगतीने पूर्ण करण्यावर एकमत व्यक्त केले.
बैठकीत केवळ अधिकारीच नव्हे, तर समिती सदस्य व ग्रामस्थांनीही आपल्या भागातील स्थानिक समस्या मांडल्या. यावर आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. ही बैठक केवळ औपचारिकता नसून ग्रामीण विकासाला ठोस दिशा देणारी ठरली आहे.
या बैठकीस मयूर भंगाळे, रुपेश कुमार सुराणा, डॉ. उल्हास देवरे, एन.आर. पाटील, भूषण कदम, वैशाली जडे, एस.बी. देसले, एच.के. पाटील यांच्यासह समिती सदस्य अनिल सिसोदे, रिता बाविस्कर, गौरव पाटील, चेतन पाटील आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments