अमळनेर शहरात १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त "स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू राजे" या महानाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संस्कृती फाऊंडेशन आणि जयनिल फाऊंडेशनच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे सादरीकरण होणार असल्याची माहिती युवा उद्योजक गौतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आमदार अनिल पाटील आणि माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांचे पुत्र गौतम पाटील यांनी सांगितले की, सामाजिक जाणीव आणि विविध क्षेत्रांतील उणिवा दूर करण्यासाठी जयनिल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून, संस्थेच्या कार्याचा प्रारंभ या महानाट्याने होत आहे.
हे महानाट्य सात्विक ठकार लिखित आणि राकेश राजपूत दिग्दर्शित आहे. यात सुमारे २५० कलाकार असून त्यातील १०० हून अधिक कलाकार अमळनेर परिसरातील आहेत. ज्या नवोदित कलाकारांना संधी मिळत नाही, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा संस्कृती फाऊंडेशनचा मुख्य उद्देश आहे.
या महानाट्याचे यापूर्वी नंदुरबार आणि धुळे येथे तीन यशस्वी प्रयोग झाले असून अमळनेरात होणारे प्रयोग हे चौथे आणि पाचवे असतील. गेल्या १५-२० दिवसांपासून स्थानिक कलाकारांना यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून जळगाव आणि अमळनेर येथे 'संस्कृती कला विद्यालय' स्थापन करण्यात येणार असून, त्याद्वारे अभिनय, व्यक्तिमत्व विकास आणि स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार असल्याची माहिती कलाकार निकेश राजपूत यांनी दिली.
जयनिल फाऊंडेशनच्या माध्यमातून भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, रोजगार मेळावे, युवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि क्रीडा गुणांना वाव देण्याचे नियोजन आहे. छत्रपती संभाजी महाराज हे तरुणाईचे आदर्श असल्याने खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी या महानाट्याचा एक प्रयोग राखीव ठेवण्यात आला आहे. तरी तरुण-तरुणींनी आपले प्रवेश पासेस फाऊंडेशनच्या कार्यालयातून घेऊन जावेत, असे आवाहन गौतम पाटील यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस संस्कृती फाऊंडेशनचे कलाकार उपस्थित होते.
- लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
७९७२८ ८१४४०
0 Comments