श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वणीवर 'श्रीकृष्ण सखी महिला मंडळ, पुणे' यांच्या वतीने 'कृष्ण उत्सव भजन सेवावृत्ती संमेलन २०२६' या भक्तीमय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ५ व ६ सप्टेंबर २०२६ (शनिवार व रविवार) रोजी आयोजित करण्यात आलेला हा भक्ती, सेवा व संस्कृतीचा महोत्सव मुक्ताईनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या राज्यस्तरीय स्पर्धेत अमळनेर येथील "सुवर्ण कला सांस्कृतिक ग्रुप"ने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक व लेखिका डॉ. तारा भवाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. भजन मंडळ संयोजिका कांता बोरा नारदीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिणी परांजपे या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
या स्पर्धेत विदर्भ व खानदेशातील मलकापूर, खामगाव, लाड कारंजा, अकोला, पारोळा, एरंडोल आणि अमळनेर अशा विविध ठिकाणांहून एकूण १७ महिला मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या चुरशीच्या स्पर्धेत अमळनेरच्या 'सुवर्ण कला सांस्कृतिक ग्रुप'ने आपल्या सुमधुर आणि भक्तीमय सादरीकरणाने परीक्षकांची व प्रेक्षकांची मने जिंकून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
मंडळाच्या या घवघवीत यशात करुणा मधुकर सोनार, लता दुसाने, आशा दुसाने, शोभा पांडव, ज्योती भामरे, विद्या भामरे, सुरेखा विसपुते आणि सुनीता विसपुते यांचा सक्रिय सहभाग व मोलाचा वाटा राहिला.
'सुवर्ण कला सांस्कृतिक ग्रुप' गेल्या १२ वर्षांपासून कला आणि संस्कृतीच्या जतनाचे कार्य अविरतपणे करत आहे. डोहाळे जेवण, बारसे, वाढदिवस, गणपती, नवरात्र उत्सव, महालक्ष्मी उत्सव, तसेच एकादशी अशा सर्व प्रकारच्या मंगल व धार्मिक कार्यक्रमांमध्ये हा ग्रुप अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत या ग्रुपने खानदेश, बागलाण आणि गुजरात राज्यापर्यंत आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. महिलांचा हा ग्रुप विविध कार्यक्रम सादर करीत आयोजकांच्या उत्साहात भर टाकतो.
अमळनेर शहरात सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणारा एकमेव ग्रुप म्हणून 'सुवर्णकला सांस्कृतिक ग्रुप'ने सर्वदूर आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या या यशाबद्दल अमळनेरकर व परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments