खारी माती, गळके धाबे आणि आठवणींचा पाऊस...!

आपल्या पैकी किती लोकांना अशी घरे, खारी माहित आहे? , जरुर कमेंट करून कळवा..
पावसाळ्याची चाहूल लागली, की मातीचा तो पहिला सुगंध नकळत एका जुन्या, हरवलेल्या जगात घेऊन जातो. आजकाल शेतात निंदणीची धांदल उडताना दिसते, पण ‘धाबे निंदायला जातं का कुणी?’ हा प्रश्न आता विचारला, तर नव्या पिढीच्या चेहऱ्यावर केवळ प्रश्नचिन्हच उमटेल. शहरात, नव्हे आता अगदी गावाखेड्यातही बोटावर मोजण्याइतकीच धाब्याची घरे उरली आहेत. काळाच्या ओघात जशी माणसं बदलली, तशी घरंही बदलली. 'सागवानी खांब', 'लाकडी तुळया', 'कडीपाट', आणि 'मावटी' हे घरबांधणीचे अस्सल गावरान शब्द आता अनेकांच्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार झाले आहेत. सिमेंटच्या जंगलात हरवलेली ती मातीची ऊब आणि धाब्याच्या घरांची ती जुनी शान आता केवळ आठवणींतच उरली आहे.
​ग्रीष्म ऋतूचे चटके वाढू लागले की, मे महिन्याच्या अखेरीस जुन्या काळात एक वेगळीच लगबग सुरू व्हायची. ती असायची धाब्यावर पांढरट-पिवळी ‘खारी माती’ टाकण्याची! पावसाळा सुरू होण्यापूर्वी घराचं छत सुरक्षित करण्यासाठी चाललेली ही धडपड म्हणजे एक मोठा सोहळाच असायचा. अमळनेर लगत असलेल्या खळेश्वर, रंजाने, तासखेडे अशा गावांच्या शिवारातून, नदीकाठच्या विशिष्ट भागांतून बैलगाड्या भरभरून ही खारी आणली जायची. या खारी मातीवरच अनेकांचा उदरनिर्वाह चालायचा. बैलगाडी मालक, माती खोदणारे मजूर, आणि ती धाब्यावर लीलया पसरवणारे कामगार अशी एक मोठी साखळी यातून हक्काचा रोजगार मिळवायची.
​ज्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरत असे, ती सधन मंडळी मे महिन्यातच निवांतपणे धाबे कोरून, उकरून, लेव्हल करून त्यावर खारी टाकून घ्यायची. पण खरी अडचण असायची ती गरिबांची. खिशात केवळ वीस-बावीस रुपये नसल्यामुळे अनेकांची कामे रखडायची आणि पावसाळ्याची ती धाकधूक मनात घेऊनच ते दिवस ढकलायचे. साधारण सात जूनच्या आसपास मृग नक्षत्राचा पाऊस असा काही दणकून यायचा की, ज्यांनी धाब्यावर खारी टाकलेली नसायची, त्यांच्या घरात पावसाळ्याआधीच आभाळ फाटल्यासारखं व्हायचं. थोडासा जरी पावसाने जोर धरला, की घर गळायला लागायचं आणि मग गळक्या घरामुळे घरातला जीव नकोसा होऊन जायचा. अशा वेळी मग नाइलाजाने, कुठूनतरी उधार-उसनवार करून पैशांची जुळवाजुळव व्हायची. अंगावर घोंगडी टाकून, चिखल तुडवत माती आणून देणाऱ्याकडे पायपीट सुरू व्हायची. तो खारीवालाही थोडा मानी असायचा. पावसाचे आणि चिखलाचे कारण सांगून तो दोन रुपये जास्तच सांगायचा. मग पावसाची थोडी उघडीप पाहताच, दारात खारी मातीचा ढिगारा येऊन पडायचा.
​मग सुरू व्हायचा तगारी आणि फावड्यांचा खणखणाट! ही माती धाब्यावर नुसती टाकून चालत नसे, तर ती एक कला होती. घरातील एखादी जाणकार व्यक्ती किंवा शेजारच्या अनुभवी माणसाला खास निमंत्रण देऊन बोलावले जायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीड-दोन तास खारी पसरवण्याचे आणि चोपण्याचे काम चालायचे. गल्लीतले लोक कुतूहलाने हा प्रकार पाहत असत. पण एवढं सगळं करूनही, दोन-तीन पावसानंतर जर घर गळलंच, तर मात्र ज्याने खारी आणली त्याची खैर नसायची. त्याच्याकडे जाऊन जाब विचारला जायचा, "चांगली खारी आणली नाही", किंवा "ती नीट पसरवली नाही", अशा शब्दांत त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जायची. कुणी अभिमानाने सांगायचं, "आमच्या धाब्यावर तीन वर्षं खारी टाकली नाही तरी टिपूसभर पाणी गळत नाही!" तर कुणी खारी आणणाऱ्याच्या नावाने बोटं मोडत बसायचं.
​पण धाब्याची ही कहाणी केवळ खारी टाकण्यावरच संपत नसे. खरा कस लागायचा तो श्रावणात! श्रावण लागला की पावसाच्या संततधारेने धाब्यावर हिरवेगार तण वाढू लागायचे. या वाढलेल्या गवताची मुळे धाब्यात घट्ट रुतून बसायची आणि श्रावणझडीचे पाणी थेट त्या मुळांवाटे घरात झिरपू लागायचे. घर गळायला लागलं की मग 'धाबे निंदणी'चा छोटासा पण अत्यंत कष्टाचा रोजगार उपलब्ध व्हायचा. गल्लीतील एखाद-दुसरी वयोवृद्ध, पण अनुभवी आजीबाई हातात खुरपे घेऊन बोलावणे येईल त्या धाब्यावर जायची. हे काम साधेसुधे नव्हते; त्यात मोठे कौशल्य दडलेले होते. पावसाळा संपेपर्यंत तिथे पुन्हा गवत उगवता कामा नये, निंदताना धाब्याची लेव्हल कमी-जास्त होता कामा नये, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, धाब्यावर चालताना खाली घरात माती पडणार नाही, याची अत्यंत काटेकोर काळजी घ्यावी लागे. त्यामुळेच या कामासाठी जाणकार महिलांनाच प्राधान्य असे. एका धाब्याचे चार-पाच रुपये आणि काम मोठे असेल तर त्या पटीत भाव मिळायचा. वरून यजमानांकडून आग्रहाचा चहा मिळायचा तो वेगळाच!
​आज हे सारे आठवताना एकीकडे गंमत वाटते, पण दुसरीकडे ज्यांची घरे पैशांअभावी गळायची, त्यांची अवस्था आठवून मन विषण्ण होते. या गळक्या घरांना कंटाळून अनेकांनी अनेक स्वप्ने पाहिली. "दोन पैसे हातात आले की धाब्यावर प्लास्टिक टाकून घेऊ, धाबे काढून पत्रे टाकू... आणि मुले कमावती झाली की आपणही प्लॉट घेऊन स्वतःचं पक्कं घर बांधू..." अशी गोड स्वप्ने उराशी बाळगून अनेक डोळे कायमचे मिटले गेले. स्वप्न पूर्ण होण्याच्या आतच त्यांची या जगातून एक्झिट झाली.
​मी स्वतः या साऱ्या प्रवासाचा, या मातीच्या गंधाचा एक अविभाज्य भाग होतो. हे सारे ऋतू, हे गळके धाबे, ती खारी माती आणि ती निंदणी करणारी माझी आजी रेणूबाई मी अगदी जवळून अनुभवली आहे. तिच्या पदरात मी देखील गळक्या धाब्याच्या घरात वाढलो आहे..
 एकूणच, धाबे सावरणे, पावसाळ्यापूर्वी खारी टाकणे आणि श्रावणात धाबे निंदणे, हा सगळा मातीशी जोडलेला प्रकार आता अगदी ग्रामीण भागातूनही कालबाह्य होत चालला आहे. मातीच्या घरांची जागा सिमेंटच्या पत्र्यांनी आणि स्लॅबने घेतली आहे. जुन्या आठवणींचा हा मळा आता फक्त मनातच फुलतो, कारण वास्तवात 'कालाय तस्मै नमः' हेच एकमेव सत्य उरले आहे.
-​धनंजयबापू सोनार, अमळनेर
7972881440

Post a Comment

0 Comments