स्वयं घोषित भूमिपुत्र अनिल पाटील यांचे संभाव्य आसन डळमळीत? ​

अमळनेर बाजार समितीच्या राजकारणाने खळबळ: संचालक भोजमल पाटलांसह अनेकांच्या बंडखोरीची चर्चा!
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात सध्या मोठी चलबिचल पाहायला मिळत आहे. आमदार अनिल पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आणि बाजार समितीचे विद्यमान संचालक भोजमल पाटील यांनी थेट सरकारला आरसा दाखवणारी पोस्ट केल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
भोजमल पाटील यांचे पोस्ट मुळे हा ​शेतकरी हिताचा टाहो की आगामी निवडणुकांची पूर्वतयारी? असा सवाल आता सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.
यात नवीन भर पडली असून ​सभापती अशोक आधार पाटील हे प्रमुख निमंत्रक असलेले आरोग्य शिबिर उद्या सुरू होत असताना, सहकारी संचालक मंडळातील अनेकांना रात्री उशिरापर्यंत साधा निरोपही देण्यात आलेला नाही. यावरून संचालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. त्यातच भोजमल पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर साधलेला निशाणा राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरत आहे.
​"भीक नको, हक्क द्या" या आशयाची पोस्ट शेअर करत भोजमल पाटलांनी सरकारवर उघडपणे ताशेरे ओढले आहेत. ही पोस्ट म्हणजे पक्षश्रेष्ठींविरुद्धचे उघड बंड तर नाही ना, अशी शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात आहे. बाजार समितीत प्रमुख पद आज ना उद्या मिळेल या आशेवर दिवसरात्र पायपीट करणाऱ्या भोजमल पाटलांची सभापती पदावर अद्याप वर्णी न लागल्याने कार्यकर्त्यांमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.
आमदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह...
​नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहत असताना, आमदार अनिल पाटील हे दिलेला शब्द पाळण्यात अपयशी ठरल्याची चर्चा आहे. "बाजार समितीत आळीपाळीने सत्तांतर घडवून आणू" हा शब्द पाळता न आल्याने भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांची स्थिती सध्या बिकट झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
​दुसरीकडे, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, पंचायत समितीचे माजी सभापती असणाऱ्या भोजमल पाटलांनी आपला जम बसवण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली असल्याचीही चर्चा रंगली आहे.
​वरवर मजबूत दिसणाऱ्या बाजार समिती पदाधिकारी मंडळात अनेकांना सभापती पदाची आस लागली आहे. अशा स्थितीत 'आधार'विना होणारी वाटचाल नेत्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. भोजमल पाटलांची ही आक्रमक भूमिका खरोखरच सर्वसामान्य शेतकरी हितासाठी आहे की आगामी निवडणुकांसाठीची राजकीय स्टंटबाजी, हे नजीकच्या काळातच स्पष्ट होईल. तूर्तास, सभापती पदासाठी इच्छुक असलेल्यांनी आमदारांविरोधात मोट बांधल्याने, स्वघोषित भूमिपुत्र पाटलांचे आसन डळमळीत झाल्याचे चित्र अमळनेरच्या राजकारणात उभे ठाकले आहे.
​                                    – लोकहितवादी पत्रकार
                                      धनंजयबापू सोनार
                                       ७९७२८८१४४०

Post a Comment

0 Comments