स्वतःच वार्ताहर, संपादक, प्रूफ रीडर व पेपर टाकणारे.. अशी बहुरूपी दुनिया असलेल्या ट्रेडलच्या काळातील आठवणी.
आज 'जागतिक मुद्रण दिन'. आजच्या हायटेक युगात जेव्हा आपण स्मार्टफोनवर एका क्लिकवर बातम्या वाचतो, तेव्हा मागे वळून पाहताना १८८५ ते २००० हा कालखंड एखाद्या स्वप्नासारखा वाटतो. १९८४-८५ च्या सुमारास जेव्हा मी पत्रकारितेत पाऊल ठेवले, तेव्हा मुद्रण क्षेत्रावर 'ट्रेडल मशीन' आणि 'खिळ्यांच्या जुळणीचा' (Letterpress printing) राजवाडा होता. आजच्या 'कॉपी-पेस्ट' पत्रकारितेच्या जमान्यात त्या काळातील तो खडतर संघर्ष आणि त्यातील निखळ आनंद यांची आठवण येणे स्वाभाविक आहे.
मुद्रण कलेचा इतिहास तसा जुना आहे. १४३९ मध्ये जोहान्स गुटेनबर्गने आधुनिक मुद्रण कलेचा पाया रचला. पण वृत्तपत्र छपाईला गती मिळाली ती 'ट्रेडल प्रेस'च्या शोधामुळे. स्टीफन डब्लू. रुल यांनी १९ व्या शतकात विकसित केलेले हे मशीन म्हणजे मानवी कष्टाचे आणि यंत्राचे एक अजोड समीकरण होते. भारतात १८ व्या शतकात पहिले वृत्तपत्र 'हिकीज बंगाल गॅझेट' सुरू झाले, पण ग्रामीण भागात पत्रकारिता खऱ्या अर्थाने रुजली ती या छोट्या ट्रेडल मशीन्समुळेच.
त्याकाळी बातमी लिहिणे जेवढे आव्हानात्मक होते, त्यापेक्षा ती छापणे जिकिरीचे होते. ट्रेडलवर छपाई म्हणजे खिळे जोडून शब्द तयार करणे. काना, मात्रा, वेलांटीचे ते छोटेसे शिशाचे खिळे एकत्र करून ओळी तयार व्हायच्या. एकदा खिळे जुळवले की त्याचा 'प्रूफ' काढला जायचा. तीन-तीन वेळा प्रूफ तपासावा लागायचा. एखादी वेलांटी चुकली की प्रेसवाल्याच्या कपाळावर आठ्या पडायच्या, कारण पुन्हा पूर्ण प्लेट काढून त्याची पॅकिंग सोडवून ते खिळे बदलणे म्हणजे जिकिरीचे काम होते. आणि एक गंमत भारीच होती... गंमत कसली दिव्य होते दिव्य... आज आपण मोबाइलने फोटो काढतो आणि सेकंदात बातमीसोबत लावतो. पण तेव्हा पेपरमध्ये एक फोटो छापायचा असेल तर धुळ्याला जाऊन त्याचा 'ब्लॉक' बनवून आणावा लागायचा. ४०-५० रुपयांचा ब्लॉक आणि धुळ्याचा प्रवास, हा खर्च म्हणजे त्याकाळी मोठी गुंतवणूक होती. ब्लॉक साठी 100 रुपये लागतील असे सांगताना जीभ जड व्हायची पण जेव्हा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तो फोटो छापून यायचा, तेव्हा मिळणारे समाधान शब्दातीत होते. एखादे दिवशी पेपरला 4 फोटो म्हणजे खूप मोठे काम वाटे.
अमळनेरचा तो सुवर्णकाळ आणि आमची पत्रकारिता, छपाई साठी धुळे जाणे किंवा प्रेस वाल्याला तयार करणे अवघड काम असे. अमळनेरमधील आंबेडकर चौकातील ते दिवस आजही डोळ्यासमोर उभे राहतात. अमळनेररात असे ट्रेडल मशीन मोजकेच होते त्यात चंदूभाई शाह यांची साधना प्रेस, बडगुजर यांची म्हसकर प्लॉट मधील प्रेस, गयभू पाटील यांची भागवत रोड येथील प्रेस, गुजराती यांची जागृती प्रेस, सत्यनारायण प्रेस अन्य बाकीही होत्या ज्या पत्रिका, पावती पुस्तके वगैरे छापत.. बालमिया मशीद जवळ अतिक्रमणात एक प्रेस सुरू झाली होती, वीज नसल्याने ती भिका चौधरी चक्क हाताने चालवायचा. चाकाचे हँडल फिरवून तो छपाई करायचा माझा गल्लीमैदान त्याने अनेकदा छापून दिलेला. तसेच डॉ आंबेडकर चौकात कासारे यांचे कडे भागवत कासारे, त्याघा भाऊ व त्यांचे वडील रात्रभर ट्रेडलवर आमचे पेपर छापायचे. आम्ही आमचा पेपर आधी निघावा म्हणून बसून राहत.
तेंव्हा अमळनेरात 'लोकमानस'चे माधवराव व त्यांची मुले सुतार बंधू, ग. का. सोनवणे, ना. स. बडगुजर, अरुण मोरे, कृष्णा पाटील, प्रतिभा पब्लिसिटीचे प्रभाकर देशमुख अशा दिग्गजांच्या सहवासात आमची पत्रकारिता बहरली. मी स्वतः 'गल्ली मैदान', 'संघर्ष', 'एकच ठोसा' अशी नियतकालिके चालवली. तेव्हा आम्हीच बातमीदार, आम्हीच संपादक, आम्हीच प्रूफ रीडर आणि छपाई झाल्यावर स्वतःच सायकलवर पेपर वाटणारे वितरकही!
दिवंगत हिरालाल पाटील यांचा अमळनेरचा आवाज, विवेक अहिरराव यांचा पूर्व खानदेश, बाळकृष्ण बागुल यांचा उदयकाळ, महेश देशमुख यांचा आवर्त, नाममात्र संपादक हिरामण खांजोडकर यांचा अटकाव, राजू पोतदार यांचा आमचा अधिकार, नंतर प्रा अशोक पवार यांनी अहिराणीचा आवाज सुरू केला. कासारे यांचेकडे अमळनेर पारोळा येथून अनेक येत त्यांच्या तयार बातम्या उचलून त्यांनीही एक वृत्तपत्र सुरू केले असे अनेक साप्ताहिक, दैनिक प्रसिद्ध होत. आमचे बघून म्हणा, पत्रकारितेचे वलय म्हणून म्हणा किंवा स्वतःचे अवैध धंदे लपविण्यासाठी म्हणा काही 'व्यापारी' देखील मैदानात आले तोवर ऑफसेटचा उदय येऊ घातला होता. दिवंगत राजू पोतदार वृत्तपत्र विक्रीचे काम करी, पेपर वाटता वाटता तोही पत्रकार झाला तसा कासारे बंधू खिळे जुळवता जुळवता पत्रकार झाले.. हा तो ट्रेडलचा काळ होता.
२००० नंतर 'ऑफसेट प्रिंटिंग'चा जमाना आला. झटपट काम, रंगीत छपाई आणि सुबकता आली. पण ट्रेडलवरच्या त्या गमतीजमती हरवल्या. पूर्वी बातमी लिहिताना शब्दांत 'दम' असायचा. एक बातमी 4 वेळा लिहीत चुरगळुन फेकलेली कागदे आजही आठवतात, मनासारखे लिहुन होत नाही तो पर्यंत चैन नसे.. आज 'जेमिनी' किंवा 'AI' कडून मजकूर लिहून घेण्याची सवय लागल्याने लेखणीतील ती धार कमी झाली आहे की काय, असे वाटते. गल्ली बोळात अनेक पत्रकारही निर्माण झाले, अनेकांनी तर पगारी लेखक ठेवून घेतलेत, काही नुसत्या चहावर बातम्या लिहून देतात- घेतात व पत्रकारितेतील काही कळत नाही तेही संपादक/प्रतिनिधी म्हणून वावरत आहेत. ज्यांना कॉपी पेस्ट ची सवय लागली त्यांना चुकीच्या जागी उकार किंवा वेलांटी पडल्यामुळे होणारा अर्थाचा अनर्थ आणि त्यावर होणारी हसण्यावारी चर्चा काय समजणार? ती गम्मत जम्मत आता इतिहास जमा झाली आहे.
तेंव्हा पेपर कुठे छापता,? असा अदबिचा सवाल असायचा, पत्रकार म्हणून एक क्रेज होती, मान होता. खरे तर मंतरलेले दिवस होते.
आज ऑफसेंटच्या जमण्यातही ट्रेडल मशीन आजही पावती पुस्तके, विशिष्ट कामे किंवा नंबरिंगसाठी वापरली जातातच. पण तो वृत्तपत्रांचा रंजक, रोचक, संघर्षमय काळ आता संपुष्टात आला आहे. जुन्या कारागिरांनी ही कला जोपासली, त्यांना आज सलाम करण्याचा दिवस आहे. नवीन पिढीच्या पत्रकारांना माझी हीच विनंती आहे की, एकदा तरी जुन्या प्रेसवाल्यांना भेटा, ट्रेडल वर जे पेपर काढायचे त्या संपादकाना भेटा, त्यांच्या मुलाखती घ्या अनुभव ऐका.. 'कॉपी-पेस्ट'च्या जगात स्वतःच्या कष्टाने आणि खिळ्यांच्या जुळणीतून तयार होणाऱ्या त्या शब्दांची किंमत काय असते, हे तुम्हाला तेव्हाच समजेल.
मुद्रण दिनाच्या सर्व कारागीर, मालक आणि पत्रकार मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा!
-धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार
79728 81440
0 Comments