नावात काय आहे म्हणता? अहो नावातच आहे खरी गम्मत!!

“नावात काय आहे? — गावगाड्यातील विचारांची टपरी, तत्त्वज्ञानाची पाटी!”
नावात काय असतं म्हणे? — अहो, आपल्या गावाकडं तर नावातच अर्धा इतिहास, चिमूटभर विचारधारा आणि भरपूर विनोद दडलेला असतो! 
😄
आपण ज्या विचारावर, संघटनेवर किंवा माणसावर प्रेम करतो, त्याची अभिव्यक्ती दुकानाच्या पाटीवर करायची ही एक वेगळीच धन्यता. कधी ती कौतुकास्पद वाटते, तर कधी लोकांच्या चर्चेचा 'चहा' बनते!
अशाच काही भन्नाट आणि खुमासदार आठवणी...
पारोळ्यात आमचे लालचंद नागदेव यांनी मटण आणि “विशेष पेय” म्हणजे चक्क दारू विक्री होत असलेलं हॉटेल सुरू केलं... आणि नाव ठेवलं — ‘हॉटेल चार्वाक’!
आता चार्वाकाच्या तत्त्वज्ञानाला शोभेल असंच नाव म्हणायचं की काय असे लोक विचारत ! आणि खुलासा देण्यातच जास्त वेळ जाई 
अमळनेरमध्ये जब्बार खाटीक — धर्माने कर्मठ मुस्लिम, पण विचाराने जबरदस्त पुरोगामी! त्याच्या भंगार दुकानाचं नाव — ‘डेबूजी स्क्रॅप सेंटर’!
भंगारातही विचारांची किंमत जपणारा हा माणूसच विरळा म्हणायचा!
नाशिक जिल्ह्यातील छात्रभारतीचा एक उत्साही कार्यकर्ता — त्याने थेट दुग्ध व्यवसायात उडी मारली आणि नाव ठेवलं ‘छात्रभारती दुग्धालय’!
दूध पिताना विचारांचीही ताकद मिळावी बहुतेक!
देवळी (४०गाव) येथे कुणीतरी भन्नाट कल्पना लढवली — ‘छात्रभारती पान सेंटर’!
पान खाल्लं की विचारही रंगून जावेत!
धुळ्यात गरुड हायस्कूलजवळ ‘सेवादल समोसा’ इतका फेमस झाला होता की समोसासोबत विचारही तळले जातायत की काय अशी शंका यायची!
अमळनेरमध्ये जनता पार्टीचे तत्कालीन शहराध्यक्ष रामचंद्र पाटील — त्यांनी उघडलं ‘जनता पार्टी टी स्टॉल’, आणि नंतर साधं करून ‘जनता टी स्टॉल’!
राजकारण चहात विरघळलं म्हणायचं
तर नासिकला 'संघी चहा ' होते..अनेकदा कुणी घ चा ग करून जायचे... म्हणताना संगी असेच म्हणायचे.
पुण्यात एकेकाळी ‘समाजवादी वडापाव’चा जमाना होता, तर कोल्हापूरमध्ये ‘सेक्युलर चिकन सेंटर’ने चक्क धूम केली!
विचारधारा आणि भूक — दोन्ही भागवण्याची सोय!
अशाच एकाने सॅनिटायझरच्या धर्तीवर 'चहा_टायझर' नाव ठेवून आपल्या 'स्वच्छ' मेंदूचा परिचय दिलेला किस्सा आहे..
जळगावजवळ पारोळ्यात तर कमालच — दारू दुकानाचं नाव ‘छत्रपती परमिट रूम’!
इतिहास आणि हकीकत यांचा भन्नाट संगम!
आणि सगळ्यात गोड आठवण — अमळनेरचे आमचे मित्र उत्तम गायकवाड यांची.
सानेगुरुजी एकदा त्यांच्या दुकानात दाढी-कटिंगला आले होते म्हणे, म्हणून त्यांनी ठरवलं होतं — ‘सानेगुरुजी केश कर्तनालय’!
नंतर ते कट्टर शिवसैनिक झाल्यावर नाव बदलून ‘शिवसेना कटिंग सलून’ ठेवायचा विचार डोक्यात शिरला...
पण बोर्डासाठी लागणारे ते दोनशे रुपये कधी जुळले नाहीत… आणि ती कल्पना तशीच राहिली…
माणूस गेला, पण ती आठवण आजही हसवते आणि हलवूनही जाते.
खरंच, या पाट्या म्हणजे फक्त नावं नाहीत — त्या काळाचं, विचारांचं आणि माणसांच्या भावविश्वाचं जिवंत संग्रहालय आहेत.
कुठे चार्वाक, कुठे समाजवाद, कुठे सेक्युलर विचार — आणि सगळं अगदी मस्तपैकी आपल्या रोजच्या आयुष्यात मिसळलेलं!
नावं वाचताना हसू येतं… पण थोडा विचारही करायला लावून जातात!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
७९७२८ ८१४४०

Post a Comment

0 Comments