शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील, तर उपाध्यक्षपदी गणेश भामरे यांची बिनविरोध निवड

अमळनेर तालुका शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील, तर उपाध्यक्षपदी गणेश भामरे यांची बिनविरोध निवड

अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी लोटन पाटील (लोण) आणि उपाध्यक्षपदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

तालुका शेतकी संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनल'चे १०, काँग्रेस प्रणित शेतकरी पॅनलचे ३, तर भाजप प्रणित 'किसान विकास पॅनल'चे २ संचालक निवडून आले होते. आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याच गटाकडे कायम राहिली.

​शुक्रवारी सकाळी ११ वाजता शेतकी संघाच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मराज पाटील यांनी, तर सहाय्यक अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले. निर्धारित वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाकडून प्रत्येकी एकच अर्ज आल्याने, या दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या: आ. अनिल पाटील

निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले की, "जनतेने विश्वासाने ही संस्था आपल्या हाती सोपविली आहे. त्यामुळे संघाचे उत्पन्न वाढवून संस्था अधिक सक्षम करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या, प्रसंगी विकासासाठी कर्ज घ्यावे लागले तरी चालेल, मात्र संस्था प्रगतीपथावर नेणे गरजेचे आहे." तसेच, ज्या कार्यकर्त्यांनी पॅनलच्या विजयासाठी मेहनत घेतली, त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून संधी द्यावी, अशा सूचनाही त्यांनी संचालक मंडळाला दिल्या.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केले, तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश भामरे यांनी आभार मानले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, तिलोत्तमा पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संभाजी पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

निवडीपूर्वीच संभाजी पाटील यांनी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

-धनंजयबापू सोनार लोकहितवादी पत्रकार 

7972881440

Post a Comment

0 Comments