​गाळ उपशाच्या नावाखाली मुरमाची खुलेआम लूट; महसूल प्रशासन मात्र गाढ निद्रेत!

निसर्डी पिंपळे भागातील धरणातून गाळ काढण्याचे केवळ निमित्त करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खोदाई करत मुरमाची राजरोसपणे लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या डोळ्यांत धूळफेक करत आतापर्यंत तब्बल दोन हजार ब्रासपेक्षा जास्त मुरमाची वाहतूक झाली असून, दररोज मोठ्या प्रमाणावर ही अवैध खोदाई सुरू आहे. मात्र, स्थानिक तलाठी आणि महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने त्यांच्या भूमिकेवर मोठी शंका उपस्थित होत आहे.
धरणातील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू आणि मुरूम माफियांनी धरण क्षेत्रात उच्छाद मांडला आहे. 'माल लगाव, माल मिलेगा' या थाटात माफियांची अरेरावी सुरू असून, बिनदिक्कतपणे मुरमाच्या गाड्या भरून नेल्या जात आहेत. या अमर्याद आणि अनियंत्रित खोदाईमुळे धरण क्षेत्रात मोठमोठाले आणि जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत.
​जीवितहानीची टांगती तलवार
या बेकायदेशीर उत्खननामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठा धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमध्ये पडून परिसरातील पशुधन, शेतकरी किंवा शेतमजुरांचा जीव जाण्याची दाट शक्यता आहे.
​"जर वेळीच या अवैध प्रकाराला पायबंद घातला नाही आणि भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा पशुधनाची हानी झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर आणि स्थानिक प्रशासनावर असेल," अशी भीती आणि संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
​महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट होत असताना या भागातील तलाठी व महसूल कर्मचारी 'तेरी भी चूप आणि मेरी भी चूप' अशा भूमिकेत आहेत. प्रशासनाच्या या अर्थपूर्ण मौनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट द्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
परिसरातील जागरूक नागरिकांनी या लुटीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई न केल्यास, संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात आहेत. आता प्रशासन या माफियांच्या मुसक्या आवळणार की आपली झोप अशीच सुरू ठेवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजय बापू सोनार 
7972881440
(वृत्तात अनेकदा प्रतिकात्मक फोटो वापरलेले असतात याची नोंद असू द्यावी.)

Post a Comment

0 Comments