गल्लोगल्ली गुटख्याचा बाजार गरम! मुख्य पुरवठादार 'अदृश्य'—

मुंढेंच्या मोहिमेला पोलीस प्रशासनाकडूनच ढीलाईचा सुरुंग?

​अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखामाफियांविरोधात जोरदार धडक मोहीम उघडली असली, तरी अमळनेर शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गल्लोगल्ली खुलेआम गुटखा विक्री सुरूच असल्याचे विदारक चित्र आहे. "एकटे मुंढे साहेब तरी काय करणार?" असा सवाल आता नागरिक विचारत असून, पोलीस प्रशासनाच्या या सुस्तावलेल्या आणि ढिम्म कारभारावर जोरदार ताशेरे ओढले जात आहेत.

​स्टेशन रोडवर कारवाई बद्दल जळगाव अन्न व औषध प्रशासनाचे अभिनंदन.. पण मोहिमेला पोलिसांची मनापासून मदत मिळत नसल्याचे चित्र आहे.

​आज अमळनेर शहरातील स्टेशन रोडवर गुटखा विक्री करणाऱ्या 'अग्रवाल' नावाच्या विक्रेत्यावर कारवाई करत त्याला अटक करण्यात आली. मात्र, ही कारवाई म्हणजे केवळ 'उंटाच्या तोंडात जिरे' ठरली असून अमळनेर पोलिसांच्या ढिलाईबद्दल तीव्र आरोप केले जात आहेत.

​कारण, ज्या रस्त्याने अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक आले आणि गेले, त्याच रस्त्यावरील असंख्य टपऱ्या आणि दुकानांवर खुलेआम गुटख्याची उलाढाल सुरू होती. अधिकारी निघून जाताच दुकानातून बिनधास्तपणे गुटख्याचे पाऊच काढून ग्राहकांच्या हातात टेकवले जात होते. "अधिकारी आता गेले..." असे म्हणत पुन्हा एकदा काळाबाजार पूर्ववत सुरू झाला!

मुख्य तस्करांना अभय कोणाचे? पोलीस यंत्रणा सुस्त!

​छोट्या टपरीचालकांवर होणाऱ्या कारवायांचे स्वागत; पण या छोट्या दुकानदारांना लाखो रुपयांचा माल पुरवणारा मुख्य पुरवठादार (तस्कर) अजूनही जेरबंद का होत नाही?

सोयीस्कर दुर्लक्ष? मुख्य तस्करापर्यंत पोलिसांचे हात का पोहोचत नाहीत, की यामागे काही 'सोयीस्कर' तडजोडीचा विषय आहे? असा थेट सवाल जनता विचारत आहे.

​शासकीय कार्यालयातील काही कर्मचारी आणि खुद्द पोलीस कर्मचारीच या टपऱ्यांवर गुटखा खरेदी करण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी आधीच गुटख्याची पुडकी वेगळी काढून ठेवली जातात, अशी 'खमंग' चर्चा अमळनेरच्या चौकाचौकांत रंगली आहे.

​कारवाईसाठी आलेल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचे नागरिक अभिनंदन करत आहेत. परंतु, केवळ छोट्या माशांवर जाळे टाकून भागणार नाही; गुटख्याची पाळेमुळे मुळापासून उपटून काढण्यासाठी मुख्य 'मगरमच्छ' (पुरवठादार) जाळ्यात येणे अत्यंत गरजेचे आहे.

​यासाठी आता स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे थेट तक्रार नोंदवून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरत आहे.

-लोकहितवादी पत्रकार,

धनंजय बापू सोनार

७९७२८८१४४०

Post a Comment

0 Comments