सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनाही दिली धमकी; पोलीस अधीक्षकांसह चोपडा पोलिसांकडे तक्रार.
"मी कसा डेंजर पोलीस आहे हे तुम्हाला दाखवतो..." असा दम भरत किरकोळ अपघाताच्या घटनेत तोडपाणी (वसुली) करण्याच्या उद्देशाने अरेरावी करणाऱ्या जीवन नामक तोतया पोलिसाचा पराक्रम चोपड्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया पोलिसावर कठोर कारवाई व्हावी आणि त्याने आजवर किती लोकांची फसवणूक केली याची सखोल चौकशी व्हावी, यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक तसेच चोपडा शहर पोलीस निरीक्षक श्री. देसले यांच्याकडे व्हिडिओ चित्रणासह लेखी तक्रार दाखल पाठविण्यात आली आहे.
काल सायंकाळी चोपडा येथील बापू डेअरी पुढील पेट्रोल पंपा जवळ एका क्रुझरचा ट्रॅव्हल्स चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने किरकोळ अपघात झाला. या घटनेनंतर खाजगी बस चालक/मालक, त्यांचे वाहक आणि परिचितांनी गाडी अडवून अरेरावी सुरू केली.
त्याच वेळी जीवन नामक व्यक्तीने स्वतःला 'पोलीस' असल्याचे सांगत, "पोलीस ठाण्यात चला, मी कसा डेंजर पोलीस आहे हे दाखवतो," असा धाक दाखवून मध्यस्थी करणाऱ्यांवर दबंगगिरी सुरू केली.
प्रवाशांना तातडीने अमळनेरला पोहोचायचे असतानाही जाणीवपूर्वक वाहन अडवून ठेवण्यात आले होते. घटनास्थळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्वाने फुगलेल्या या तोतया पोलिसाने "असे पत्रकार मी रोज चारतो आणि निपटतो" अशी मुजोरी भाषा वापरत पत्रकारांचा व उपस्थितांचा अवमान केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोपडा पोलिसांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, जीवन नामक कोणतीही व्यक्ती शहर किंवा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत नाही, अशी स्पष्ट माहिती समोर आली. यामुळे हा व्यक्ती निव्वळ तोतया पोलीस बनून वसुली आणि ब्लॅकमेलिंग करत असल्याची शंका बळावली आहे.
घटनास्थळी जमलेल्या गर्दीतील काही नागरिकांनीही, "हा नेहमीच असा पोलीस बनून वागतो, लोकांची अडवणूक करून पैसे उकळणे हाच याचा धंदा आहे," असा खळबळजनक दावा केला.
या तोतया पोलिसावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्याच्या आजवरच्या कारनाम्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी चोपडा पोलीस निरीक्षक श्री. देसले व जळगाव पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
या जीवन नामक तोतया पोलिसाकडून अमळनेर, चोपडा किंवा परिसरातील कोणत्याही नागरिकांची फसवणूक, अडवणूक किंवा पिळवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार करावी, किंवा पुढील पाठपुरावा करण्यासाठी 7972881440 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments