देव धर्माच्या नावाखाली माजलेला गुंडशाही तमाशा आणखी किती दिवस गुमान सहन करायचा?

भोंगे, डिजे, कर्णकर्कश वाद्ये व धिंगाणा देवभक्तितील खरा अडथळा..
सामान्य नागरिकांची बोलकी व्यथा...
​अमळनेर शहरात १९८५ पासून, म्हणजे गेली ३५ हून अधिक वर्षे, शांतता समितीच्या प्रत्येक बैठकीत मी आणि माझे सहकारी सातत्याने घसा ओरडून सांगत आलो आहोत—सण शिस्तीत साजरे करा, पाण्याचे नैसर्गिक स्रोत प्रदूषित करू नका, निर्माल्य आणि मूर्तींची विटंबना थांबवा, वेळेत बाप्पाला निरोप देऊन सामाजिक सलोखा राखा. मात्र, गेली साडेतीन दशके पदरी पडली ती केवळ आश्वासने आणि प्रशासकीय उदासीनता.
​सण भक्तीचा की विकृतीचा? असा सवाल आता मना मनात उठतो आहे. बाप्पा असो, नवरात्रीतील आपली आदिशक्ती माता असो किंवा अन्य सर्वधर्मीय उपासना—ईश्वर, अल्ला, देव, जिझस या सर्वांनी केवळ प्रेम, सलोखा आणि मानवी कल्याणाचाच संदेश दिला आहे. मग तो संदेश प्रत्यक्षात जगताना हा धांगडधिंगा, अंगावर येणारे डिजे आणि बेधुंद गोंधळ कशासाठी हवा? आपल्या देवाला शांतता, प्रसन्नता आणि मंगलमय आराधना हवी असते, हा साधा विचार आपण कधी समजून घेणार? भक्तीच्या नावाखाली चाललेला हा उथळ हैदोस म्हणजे श्रद्धेचा अपमान नाही का? जबरी वर्गणी गोळा केली जाते आणि असंख्य कार्यकर्ते मंडळाच्या पैशावर झिंगलेले असतात मौज मजा करतात..या कडे दुर्लक्ष करता येईल का? 
विशेष म्हणजे ​शांतता समित्यांचा निव्वळ फार्स आहे हा समज वाढीस लागला आहे. 'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे दरवर्षी सणासुदीच्या तोंडावर शांतता समितीच्या बैठकांचे सोपस्कार पार पडतात. अधिकारी नोंदी घेतात, कोरडे इतिवृत्त लिहितात आणि फायली बंद करून मोकळे होतात. प्रत्यक्ष कृती मात्र शून्य.
सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांना सामाजिक भान नाही, अशा विघातक प्रवृत्तीच्या लोकांनाच अपवाद वगळता या शांतता समित्यांमध्ये मानाचे स्थान दिले जाते. जे स्वतः अशांततेचे मूळ आहेत, ते शांतता कशी प्रस्थापित करणार? याच कारणास्तव शहरातील सुजाण नागरिकांनी आता या बैठकांकडे पाठ फिरवली आहे.
​कार्यकर्त्यांवर हल्ले आणि लाचार पोलीस यंत्रणा हे जणू समीकरण झाले आहे. 
जेव्हा एखादा सच्चा कार्यकर्ता समाजाचे हित जपण्यासाठी निर्माल्य आणि मूर्ती संकलनाचे काम करतो, तेव्हा समाजकंटक त्याला उघड धमक्या देतात. पुण्यात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेला भ्याड हल्ला ही याच बळावलेल्या विकृतीची हिंसक चपराक आहे.
सत्ताधाऱ्यांचे उंबरे झिजवणारे पोलीस प्रशासन अशा वेळी डोळ्यांवर कातडे ओढून बसते. गुंडांकडून नाममात्र 'माफीनामे' लिहून घेत कायद्याच्या पळवाटांमधून त्यांना मोकळे रान देणारी ही पोलीस व्यवस्था नेमकी कोणाची चाकरी करते आहे? सद् रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद जाते कुठे?
आणि यात ​माध्यमांची संवेदनशून्यता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. अपवाद वगळता बहुतांश माध्यमांना सामाजिक जाणिवांचे सोयरसुतक उरलेले नाही. बैठकांमधील खडाजंगी आणि भडक विधाने छापून टीआरपी मिळवायचा, पण सण-उत्सवातील वाढती गुंडशाही आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांसारख्या मूळ प्रश्नांना पद्धतशीर बगल द्यायची, हीच नीती सध्या बोकाळली आहे. म्हणून ​लोकहो, 
आता तरी जागे व्हा!
उत्सव मांगल्यासाठी असतात, पण आज धर्माच्या आडून दारूच्या नशेत चालणारा हैदोस आणि दहशत माजवली जात आहे. मूठभर राजकीय हितसंबंधांच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा लाचार झाली आहे आणि सामान्य माणूस घरात बसून हे सारे गुमान सहन करतो आहे. आपली हीच हतबलता अशा विकृतींचे बळ वाढवत आहे. सुदैवाने शेगाव असेल किंवा अमळनेर मंगळ मंदिर,  वाडी संस्थानात डीजे किंवा कर्कश आवाजाला थारा नसल्याचे आशादायी चित्र पाहायला मिळते.
​लक्षात ठेवा, जर आज तुम्ही गप्प राहिलात, तर उद्या समाजहितासाठी रस्त्यावर उतरणारा प्रत्येक आवाज कायमचा संपवला जाईल.
​'सावध ऐका पुढल्या हाका!' अराजकता आणि स्वतःच्याच शहरात ओलीस पडणे टाळायचे असेल, तर कुण्या एका नेतृत्वाची वाट न पाहता सर्व सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन सनदशीर मार्गाने या व्यवस्थेला जाब विचारलाच पाहिजे. अन्यथा गुंड माजत राहतील, बापट चापट खात राहतील आणि सामान्य जनता केवळ मूक प्रेक्षक बनून राहील.
​— धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार, अमळनेर
संपर्क: ७९७२८८१४४०

Post a Comment

0 Comments