पालखी सोहळा, भजन, रक्तदान व नेत्रतपासणी शिबिरासह विविध धार्मिक-सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद!!
सांगवी, ता. पारोळा येथील
श्री दादाजी दरबारात सेवानंद महाराज यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यास हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी पालखी व कलशाची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. टाळ-मृदंग, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्रीच्या सत्रात भजनसम्राट ओमप्रकाश तिरोले यांच्या सुमधुर आवाजातील भजन कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीसह भाविकांनी भक्तिरसात तल्लीन होत भजनांवर आनंदाने नृत्य केले.
दुसऱ्या दिवशी पहाटे त्र्यंबकेश्वर येथून आणलेल्या पवित्र गोदावरी जलाने समाधीचे तसेच बडे दादाजी, सुपडूनंद आणि नर्मदा यांच्या मूर्तींचे विधिवत अभिषेक करण्यात आले. त्यानंतर आरती, दर्शन व पूजन कार्यक्रम संपन्न झाला. या पुण्यतिथी सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री दादाजी दरबारातील धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत उपस्थित भाविकांशी संवाद साधला.
मानवसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून सामाजिक उपक्रमांना उत्तम प्रतिसाद देत सद् वर्तनाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून यंदा विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली. विशेष म्हणजे, रक्तदान करणाऱ्या सर्व ५१ रक्तदात्यांना श्री दादाजी दरबार, सांगवी यांच्या वतीने २० लिटर थंड पाण्याचा जार व रक्तदान प्रमाणपत्र भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले. तसेच, आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराचा ९० नागरिकांनी लाभ घेतला.
भाविकांसाठी महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत गुरुमाऊलींच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली.
संपूर्ण सोहळा धार्मिक उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि भक्तिमय वातावरणात अत्यंत खेळीमेळीने व यशस्वीरीत्या पार पडला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व सेवेकरी, स्वयंसेवक व भाविकांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या अथक परिश्रम व योगदानामुळेच कार्यक्रम दिमाखात पार पडल्याची माहिती श्री दादाजी दरबार, सांगवीच्या वतीने देण्यात आली.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments