कुठे गेले ते चैतन्यदायी दिवस? अमळनेरच्या गणेशोत्सवाचे हरवलेले वैभव आणि आजचे भीतीदायक ठसठशीत नकोसे वाटणारे वास्तव..? सध्या नागरिक कमी व पोलीस जास्त अशी सर्वत्र स्थिती का दिसतेय?
गणेशोत्सव म्हटला की डोळ्यांसमोर उभी राहते ती आकर्षक आरास, समाजप्रबोधन करणारे कल्पक देखावे, शिस्तबद्ध मिरवणुका आणि चैतन्याने भारलेले वातावरण. मात्र, आजचे चित्र पाहिले तर हे सारे वैभव काळाच्या पडद्याआड गेल्यासारखे वाटते. अमळनेर शहर आणि तालुक्यात अपवाद वगळता देखाव्यांचे ते सुवर्णयुग हरवल्यासारखे दिसते. आज भव्य मूर्ती, मोठेपणाचा बडेजाव आणि आवाजाची स्पर्धा यांनाच अधिक महत्त्व मिळताना दिसते.
वर्गणीच्या पैशांची उधळण करून डीजे, मोठ्या वाजंत्र्यांचा गजर आणि कर्णकर्कश आवाजात धांगडधिंगा करण्याकडे अधिक कल दिसतो. तुरळक अपवाद वगळता काही मंडळांनी देखावे उभारले असले, तरी त्यातही सामाजिक प्रबोधनापेक्षा धार्मिक देखाव्यांनाच अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे जाणवते.
पूर्वीच्या काळात म्हणजे अगदी 90-,92 पर्यंत गणेशोत्सवातील देखावे हे सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम होते. हुंडाबळी, भ्रष्टाचार, राजकीय गैरप्रकार, महागाई आणि सरकारची धोरणे अशा ज्वलंत विषयांवर अत्यंत कल्पकतेने आणि परिश्रमपूर्वक मांडणी केली जात असे.
त्या काळात मूर्तीपेक्षा देखाव्याचीच चर्चा अधिक रंगायची. व्यायामशाळांची ढोल-लेझीम पथके, राष्ट्र सेवा दल तसेच विविध सामाजिक संस्थांचे शिस्तबद्ध संचलन हे गणेशोत्सवाचे आकर्षण असायचे. आवाजावर नियंत्रण आणि कमालीची शिस्त असल्याने रात्री उशिरापर्यंत कुटुंबासह फिरणारे महिला, बालक, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण कोणत्याही भीतीशिवाय आनंदाने घरी परतत असत.
गणपती दर्शन हा त्या काळातील कुटुंबाच्या वार्षिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग असायचा. ठरलेल्या दिवशी सहकुटुंब चालत दर्शनासाठी बाहेर पडायचे. रात्री उशिरा प्रताप मिलचा गणपती पाहून दर्शनाची सांगता व्हायची; तर काहींचा प्रवास माळीवाडा गणपतीच्या दर्शनाने पूर्ण व्हायचा.
विशेष आकर्षण म्हणजे विप्रो आणि तांबेपुरा भागातील गणपतींसाठी स्वतंत्र दिवस ठरलेला असायचा. त्या भागातील गणेशोत्सवाचे वेगळेपण आणि आकर्षण सर्वांनाच भुरळ घालत असे.
शहरभर चैतन्याची लहर
आर. के. नगर, न्यू प्लॉट, शिरूड नाका, झामी चौक, माळीवाडा, पानखिडकी, मुंबई गल्ली, पैलाड आणि सिंधी कॉलनी अशा शहरातील विविध भागांत मोठ्या मंडळांच्या दिमाखदार आराशीसोबतच छोट्या मंडळांची साधी-सुंदर आरासही लक्ष वेधून घ्यायची.
कुणाची आरास अधिक प्रभावी, कुणाचा देखावा अधिक कल्पक, कुणाचा गणपती कसा—याची चर्चा चौकाचौकांत रंगायची. वृत्तपत्रांमधूनही मंडळांच्या आराशीची आणि देखाव्यांची सचित्र माहिती प्रसिद्ध व्हायची. त्यासाठी मंडळांना जाहिरातींचा अतिरिक्त खर्च करावा लागत नसे.
निर्भय वातावरण आणि आनंदाचा उत्सव असेच थेट 90-92पर्यंत तरी स्वरूप होते. आता पोलिसी बळ वापरावे लागते तरी भीती आहेच.
दगडी दरवाजाजवळ तर गणेशोत्सवाच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आलेले असायचे. महिला आणि मुले निर्धास्तपणे सहभागी व्हायची. गुलालाची उधळण व्हायची; मात्र त्यामध्ये द्वेष किंवा दहशतीपेक्षा आनंदाचा सडा अधिक असायचा. उत्सवात उत्साह होता, पण त्यासोबत शिस्त आणि परस्परांचा आदरही होता.
आजचे बदललेले वास्तव आणि वाढलेली भीती
आज मात्र परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीसोबतच त्यामागची मानसिकताही बदलल्याचे जाणवते.
तणाव आणि संकुचितता इतकी की उत्सवाचा तिटकारा यावा कारण अलीकडच्या काळात गुलालाच्या उधळणीतूनही अस्मिता आणि प्राबल्य दाखवण्याचे प्रकार दिसू लागले आहेत. गुलाल व वाद्याना आवडत्या रंग, अस्मिता, राग द्वेष यात सजवले गेल्याने त्यांची पावित्रता व मंगल सुर दिसेनासा झाला आहे. अपवाद आहेत काही हे अलाहिदा .
कारण अलीकडे वाद्यांच्या तालावरून किबा गुलाल उधळण्या वरून काही ठिकाणी वाद आणि तणाव निर्माण झाल्यामुळे उत्सवावर विविध प्रकारची बंधने येत गेली.
स्पर्धेचा बडेजाव दिवसागणिक वाढत चालला आहे. “आमची मूर्ती इतक्या लाखांची, एवढ्या दूरवरून आणली, आणण्यासाठी इतके दिवस लागले...” अशा चर्चांमधून मूर्तीची किंमत, आकार आणि उंची यांची स्पर्धा वाढताना दिसते. उत्सवातील सामाजिक आणि सांस्कृतिक आशयापेक्षा भव्यतेची फुशारकी अधिक चर्चेत येऊ लागली आहे.
वर्गणी आणि वर्चस्वाचे प्रश्न प्रकर्षाने जाणवत असताना चिंता वाढली आहे. पूर्वी स्वेच्छेने वर्गणी देण्याची परंपरा होती. आज मात्र काही ठिकाणी वर्गणीसाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. अपेक्षित वर्गणी दिली नाही तर बघून घेवू असे जाहीर धमकावले जाण्याचे प्रकार घडले व घडत आहेत. “वर्गणी द्यावीच लागेल” अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याची चर्चा होते. रस्ता अडवून सक्तीने वर्गणी मागण्यासारखे प्रकार पूर्वीच्या काळात क्वचितच ऐकायला मिळत.
सर्वत्र खाकी वर्दीची गर्दी, भीतीचे सावट असलेला उत्सव असे स्वरूप सध्या तरी अमळनेर नव्हे सर्वत्र दिसत आहे.
डीजे आणि मोठ्या वाजंत्र्यांच्या वाढत्या आवाजामुळे काही अनुचित घटना घडू नयेत, या भीतीने सामान्य नागरिक घराबाहेर पडण्यासही कचरतात, अशी परिस्थिती ठिकाणी निर्माण झाली आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक जाणवणे, हा विरोधाभास आमच्या पिढीच्या कल्पनेतही नव्हता.
पूर्वीच्या शांतता समित्यांमध्ये समाजमनावर प्रभाव असलेले आणि शांतता टिकवण्याचा अनुभव असलेले प्रतिष्ठित नागरिक सहभागी असायचे. आज मात्र अशा समित्यांच्या बैठकींबाबतही प्रश्न उपस्थित होतात. काही बैठकींमध्ये वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा प्रभाव जाणवतो, अशी नागरिकांची भावना आहे. परिणामी शांतता समितीची बैठक हा केवळ औपचारिक शासकीय सोहळा बनत चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
आज जेव्हा आम्ही आमच्या मुलांना, सुना किंवा नातवंडांना अमळनेरच्या त्या जुन्या गणेशोत्सवाची आठवण सांगतो, तेव्हा त्यांना त्यावर विश्वास ठेवणेही कठीण जाते. आपण ज्या शहरात राहतो, तिथे असा सुसंस्कृत, शिस्तबद्ध आणि आनंदमय गणेशोत्सव कधी काळी साजरा होत होता, याची कल्पनाही त्यांना अविश्वसनीय वाटते.
काळ बदलतो, उत्सवाचे स्वरूपही बदलते. मात्र, उत्सवामागचा सामाजिक आशय, संस्कार, शिस्त आणि परस्परांचा आदर आपण गमावतो आहोत का, हा खरा प्रश्न आहे.
अमळनेरच्या गणेशोत्सवाचे हरवलेले वैभव पुन्हा मिळवण्यासाठी आपण सर्वांनीच गंभीर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली नाही का?
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments