अमळनेर तालुक्यातील डांगरीत डेंग्यूचे आगमन? अस्वच्छ कारभाराने पंचक्रोशीत भीतीचे वातावरण;

ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थ संतप्त. राजकीय उदासीनता आली उजेडात.
अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरी येथे डेंग्यू सदृश आजाराने शिरकाव केल्याची चर्चा सुरू झाल्याने गावात आणि पंचक्रोशीत तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील एका रुग्णाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर धुळे/जळगाव जिल्ह्यातील प्रख्यात अमळनेर येथील डॉ. प्रशांत शिंदे यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती ग्रामस्थ आणि मारवड येथील वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर गावातील अस्वच्छता आणि तुंबलेल्या गटारींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गटारींची भीषण दुर्दशा आणि साथीच्या रोगांचे सावट
डांगरी गावात गेल्या अनेक वर्षांपासून गटारींची नियमित स्वच्छता झालेली नाही. कचरा, घाण आणि दुर्गंधीयुक्त सांडपाण्याने गटारी तुडुंब भरल्या आहेत. गावातील प्रमुख रस्ते आणि गल्ल्यांमध्ये सांडपाणी साचल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. यामुळे डास आणि माशांचा उपद्रव प्रचंड वाढला असून लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहर व तालुक्यात यापूर्वी डेंग्यूमुळे काहींना प्राण गमवावे लागल्याच्या घटना ताज्या असल्याने, आता गावात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
​'माझे गाव' म्हणणाऱ्या पुढाऱ्यांचे वजन फोल?
"माझे गाव, माझा शब्द चालतो मीच नेता" असा डांगोरा पिटणाऱ्या आणि राजकीय वरदहस्त असलेल्या स्थानिक पुढाऱ्यांचे प्रशासकीय वजन आता तोकडे पडले आहे का, असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत. राजकीय संबंधांचा फायदा गावातील मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी होत नसून, नेतेमंडळी केवळ पोकळ आश्वासने देण्यातच धन्यता मानत असल्याचा थेट आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
​ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष; कर भरूनही सुविधा शून्य
गावात सार्वजनिक स्वच्छता राखणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे. ग्रामस्थ नियमितपणे कर भरत असतानाही त्यांना आरोग्यास घातक अशा वातावरणात राहावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीवर ग्रामस्थांनी प्रशासनाला थेट जाब विचारला आहे:
​कर्मचाऱ्यांकडून गटारींची नियमित स्वच्छता का करून घेतली जात नाही?
​साचलेल्या सांडपाण्याच्या कायमस्वरूपी निचऱ्यासाठी ठोस उपाययोजना का केली जात नाही?
​स्थानिक प्रशासन कोणत्या मोठ्या अनर्थाची किंवा साथीच्या रोगांच्या उद्रेकाची वाट पाहत आहे?
​आरोग्याचा प्रश्न हा राजकारणाचा नसून कर्तव्याचा आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण गावाची तत्काळ पाहणी करून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, डास प्रतिबंधक फवारणी करावी आणि सांडपाण्याच्या निचऱ्याचे कायमस्वरूपी वेळापत्रक जाहीर करावे, अशी ठाम मागणी डांगरीवासीयांनी केली आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
येथील तरुण कार्यकर्ते व मनसेचे युवा नेते बडगुजर व सहकारी यांनी जनतेला धीर देत धावपळ चालवली असल्याचे आशादायी चित्र देखील समोर आले आहे.
ताप आला तर डेंग्यूची भीतीने गोंधळून न जाता तसेच मानसिक खचून न जाता 
योग्य त्या शासकीय किंवा योग्य त्या वैद्यकीय सल्लागारांच्या संपर्कात राहावे असे आवाहन लोकहितवादी करीत आहे. 
धनंजय बापू सोनार 
लोकहितवादी पत्रकार 
7972881440

Post a Comment

0 Comments