तापीमाई धावली डॉ. बाविस्करांच्या मदतीला! आवर्तनाची ‘रिस्क’ पडली पथ्यावर; अमळनेरचा पाणीप्रश्न सुटला
'देव नेहमीच मदतीला धावून येणार नाही' -डॉ डीगंबर महाले यांची खोचक टीका.
वरच्या भागात जोरदार पावसामुळे तापीला पूर; जळोद डोहात पाणी पोहोचल्याने नागरिकांसह प्रशासनाचा सुटकेचा श्वास
गेल्या काही दिवसांपासून अमळनेरकरांच्या डोक्यावर घोंघावणारे भीषण पाणीटंचाईचे संकट अखेर दूर झाले आहे. भुसावळ आणि तापी नदीच्या वरच्या पट्ट्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तापी नदीला मोठा पूर आला आहे. हे पुराचे पाणी आज अमळनेर शिवारातील जळोद येथील डोहात पोहोचण्याची शक्यता असल्याने, शहराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या नैसर्गिक कृपेमुळे नगरपालिका पदाधिकारी, कर्मचारी आणि सामान्य जनतेने मोठा सुटकेचा श्वास सोडला आहे.
जळोद येथील डोह कोरडाठाक पडल्याने शहरात जेमतेम आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. अशा परिस्थितीत पाण्याची आणि पैशांची बचत करण्यासाठी धरणातून पाण्याचे आवर्तन घेण्याचे टाळण्यात आले होते. या निर्णयावरून विरोधकांनी जोरदार झोड उठवत नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांना टार्गेट केले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी घेतलेली ही 'रिस्क' त्यांच्या पथ्यावर पडली असून, पावसामुळे विरोधकांच्या राजकारणातील हवाच निघून गेली आहे.
या सुखावह बातमीनंतर 'लोकहितवादी'शी बोलताना माजी आमदार शिरीषदादा चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर आणि पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. "कामाची दानत प्रामाणिक असली की निसर्गसुद्धा मदतीला धावून येतो," अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
डॉ. परिक्षित बाविस्कर (नगराध्यक्ष) : "पाणी कमी पडू नये यासाठी आमचे पर्यायी नियोजन होतेच, परंतु पाऊसही वेळेवर मदतीला धावून आल्याने आता पाण्याची कोणतीही चिंता उरलेली नाही."
कैलास पाटील (पाणीपुरवठा सभापती) : "पाणीप्रश्नावर राजकारण करून जनतेची दिशाभूल करायची विरोधकांची संधी या पावसामुळे गेली आहे. निसर्गाची अमळनेरकर नागरिकांवर मोठी कृपा झाली आहे."
वितरण यंत्रणेचे आव्हान आणि वास्तवाचा इशारा
आता मुबलक पाणी उपलब्ध झाले असले तरी, प्रत्यक्ष पाणी वितरण यंत्रणा गतिमान आणि सुरळीत करण्याचे मोठे आव्हान नगरपालिकेसमोर असणार आहे. यात प्रशासन कितपत यशस्वी होते, याकडे आता जनतेचे लक्ष लागून आहे.
दुसरीकडे, या परिस्थितीवर भाष्य करताना नगरसेवक डॉ. डीगंबर महाले यांनी प्रशासनाला वास्तवाची जाणीव करून दिली. ते म्हणाले, "शेवटी आपण निसर्गाच्या कृपेवर निभावलो. अन्यथा आणखी चार दिवस जरी पाऊस लांबला असता, तर शहरात भीषण पाणीबाणी निर्माण झाली असती. देव नेहमीच मदतीला धावून येणार नाही, हे लक्षात घेऊन भविष्यातील नियोजन असायला हवे."
- धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments