डीगंबर महालेंसह ‘शविआ’ नगरसेवक आक्रमक!
अमळनेर शहरातील पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शहर विकास आघाडी आणि पालिका प्रशासनाची नियोजित बैठक सोमवारी (२२ जून) आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता दांडी मारल्याने ‘शविआ’ने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या या अपमानास्पद वागणुकीमुळे आघाडीने आता संयमित भूमिकेऐवजी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे.
'शविआ'च्या पत्रानुसार मुख्याधिकाऱ्यांनी या बैठकीला लेखी संमती दिली होती. मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊनच आघाडीने मोर्चाऐवजी बैठकीचा पर्याय स्वीकारला होता. त्यानुसार सोमवारी दुपारी नगरसेवक डॉ.डीगंबर महाले यांचे नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी पालिकेत उपस्थित झाले. मात्र, मुख्याधिकारी पूर्वकल्पना न देताच मुंबईला निघून गेल्याचे समोर आले. शिष्टाचार म्हणून त्यांनी गटनेत्यांना फोनवरून किंवा लेखी कळवणे गरजेचे होते. या प्रकारानंतर जयश्रीताई पाटील यांनी फोनवरून मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.
नगरविकास विभागातून बोलावणे आल्याने मुंबईला जावे लागले, असे कारण मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र, रविवारी मंत्रालयाला सुटी असताना त्यांना कोणी बोलावले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात बैठकीत आपले वाभाडे निघतील या भीतीनेच त्यांनी पळ काढल्याचा आरोप होत आहे. अमळनेर पालिकेतील सध्याचे वातावरण पाहता, स्वतःची बदली करून घेण्यासाठीच त्यांनी मुंबई गाठल्याची चर्चा त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये आहे.
"मुख्याधिकाऱ्यांचे हे वागणे बेजबाबदारपणाचे आणि पदाला न शोभणारे आहे. पाणीटंचाईसारख्या अत्यंत संवेदनशील विषयाचे त्यांना गांभीर्य नाही. अचानक जाणे अपरिहार्य होते, तरीही शिष्टाचार म्हणून त्यांनी पूर्वकल्पना देणे गरजेचे होते. आमचे सर्व पदाधिकारी हातची कामे सोडून वेळेवर उपस्थित असताना ते मात्र गायब होते. उद्या किंवा परवा ते परतल्यावर आम्ही त्यांना आमच्या आत्मसन्मानाची निश्चितपणे जाणीव करून देऊ असे ‘शविआ’कडून सांगण्यात आले.
-धनंजय बापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
बातमीतील फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद घ्यावी
0 Comments