जनतेच्या कराचा पैसा जातोय कुठे? कागदावर विकास, प्रत्यक्षात बोंब असल्याचा उपसरपंच सीमाबाई शिरसाठ यांचा खळबळजनक आरोप
तर आरोप सिद्ध करा, सर्व दप्तर तपासणीसाठी खुले; समोरासमोर पत्रकार परिषदेचे सरपंच तारकेश्वर गांगुर्डे यांचे थेट आव्हान
ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठा गोलमाल असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांविरोधात थेट उपसरपंचांनीच उपोषणाचे हत्यार उपसल्याने नारखेडा-मठगव्हाण ग्रामपंचायतीत एकच खळबळ उडाली आहे. गावातील निकृष्ट दर्जाची विकासकामे आणि कथित मनमानी कारभाराची सखोल चौकशी न झाल्यास उद्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच सीमाबाई शिरसाठ यांनी दिला आहे. यामुळे तालुका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
कागदावर विकास, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच सल्याचा दावा करीत सीमाबाई शिरसाठ
उपसरपंच सीमाबाई शिरसाठ यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
"गावाचा विकास केवळ कागदावर राहू नये. जनतेच्या हक्काचा आणि कराचा पैसा योग्य ठिकाणीच खर्च झाला पाहिजे. ग्रामपंचायतीच्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून, प्रत्यक्षातील स्थिती आणि कागदोपत्री आकडेवारी यात मोठी तफावत आहे. या संपूर्ण कारभाराची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे!" अशी ठाम भूमिका घेत त्यांनी प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
सर्व दप्तर खुले, आरोप करणाऱ्यांनी समोरासमोर यावे! — सरपंच तारकेश्वर गांगुर्डे
दुसरीकडे, हे सर्व आरोप फेटाळून लावत सरपंच तारकेश्वर गांगुर्डे यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
"असा कोणताही गैरप्रकार झालेला नाही. ग्रामपंचायतीचे सर्व दप्तर (रेकॉर्ड) तपासणीसाठी खुले असून कोणत्याही चौकशीला माझा विरोध नाही. केवळ संशयावरून बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आरोप करणाऱ्यांनी समोरासमोर चर्चेसाठी यावे किंवा थेट संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी."
असे थेट आव्हान गांगुर्डे यांनी दिले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष
ग्रामपंचायतीतील अंतर्गत वाद आणि विकासकामांच्या चौकशीचा मुद्दा आता थेट रस्त्यावर येऊन पोहोचला आहे. उपसरपंचांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून, १५ ऑगस्टपूर्वी प्रशासन यावर काय तोडगा काढते आणि चौकशीचे आदेश देते का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
+लोकहितवादी पत्रकार
धनंजय बापू सोनार
7972881440
0 Comments