दादा, तुम्ही मंत्रिपद आणाच ही आमची व तमाम जनतेची इच्छा! तो अभिमान असेल.. पण न.प.निकालाची बाधा येईल की काय? तसे होऊ नये म्हणून प्रार्थना.
अमळनेरच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच चर्चेने जोर धरला आहे— ती म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची! कोकाटे यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार? आमदार धनंजय मुंडे की आमदार अनिल पाटील? या शर्यतीत अनिलदादा पाटील बाजी मारणार आणि दुसऱ्यांदा 'लाल दिवा' मिळवणार, असा ठाम विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. सोशल मीडियावर तर शुभेच्छा वअभिनंदनाच्या पोस्टचा पाऊसही पडत आहे.
आमच्यासह दादा मंत्री व्हावेत. अमळनेरला पुन्हा लाल दिवा यावा असे वाटते कारण तो अमळनेरच्या विकासासाठी आवश्यक आहे, पण... अमळनेर नगरपरिषदेच्या निकालाने या अपेक्षा व आनंदावर विरजण घातल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
●'शहर विकास आघाडी'चा धुव्वा; रिपोर्ट कार्डवर 'लाल' शेरा?
आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीचा नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मोठा पराभव झाला. हा पराभव केवळ एका स्थानिक निवडणुकीचा निकाल नसून, तो अनिल पाटील यांच्या 'पक्षीय रिपोर्ट कार्ड' वरील डाग मानला जात आहे. उरले सुरले अपक्ष देखील शिंदे सेना व शिरीषदादा/डॉ परीक्षित यांचे समर्थक झाले आहेत. त्यांना वळविण्यात यश आले असते तरी रिपोर्टकार्ड पास झाले असते. असे जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांचे मत आहे.
●नेत्यांची कसोटी:
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजप आणि शिंदे सेनेच्या तुलनेत बॅकफुटवर असताना, प्रत्येक नेत्याला आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणे गरजेचे होते.
●श्रेष्ठींची नजर:
अजितदादा आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सध्या प्रत्येक नेत्याच्या कामगिरीचा सूक्ष्म आढावा घेत आहेत. आपल्याच मतदारसंघात पकड ढीली पडली असेल, तर पक्षवाढीसाठी अशा नेतृत्वावर पुन्हा मोठी जबाबदारी सोपवावी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
● 'मन में लड्डू फुटा'... पण दिवा कुठाय?
अनिल पाटील यांचे समर्थक "दादांचे मंत्रिपद नक्की" म्हणत स्वप्न पाहत असताना, राजकीय अभ्यासकांनी मात्र याला 'धुळाची पेरणी' म्हटले आहे. प्रभावी आणि जनाधार असलेल्या लोकांना संधी दिली नाही तर पक्षवाढीवर नकारात्मक परिणाम होईल, ही भीती श्रेष्ठींना सतावत आहे. त्यामुळे सध्यातरी अनिल पाटील यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याचेच चित्र दिसत आहे.
●राजकीय वर्तुळातील खमंग चर्चा:
"सोशल मीडियावर विजयाचे गुलाल उधळणारे व मंत्रिपद नक्की म्हणणारे कार्यकर्ते आता बॅकफुटवर गेले आहेत. कारण, अमळनेरच्या जनतेने दिलेला कौल मंत्रिपदाच्या वाटेतील मोठा अडथळा ठरू शकतो."
●पुढे काय?
आता चेंडू अजितदादांच्या कोर्टात आहे. ते केवळ 'निष्ठा' पाहणार की 'निवाडा' (निवडणुकीतील कामगिरी), यावर अनिल पाटील यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. सध्यातरी अमळनेरच्या निकालाने आ.अनिलदादा पाटील यांच्या मंत्रिपदाच्या आशा अधांतरी आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments