सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी, जानेवारीत होणाऱ्या 'खाशि' (खानदेश शिक्षण मंडळ) निवडणुकीमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.
पण या गरमागरम वातावरणात एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. मतदारांना मटण-भाकरीच्या पंगती, आरामदायी गाड्यांची सफर आणि वरून 'गुलाबी नोटांची' ऊब मिळण्याची सवय जडली असताना, काही उत्साही मंडळी 'बिनपैशाचा तमाशा' मांडण्याच्या तयारीत आहेत.
"स्वच्छ चारित्र्य आणि बिनखर्ची निवडणूक" हा नारा ऐकायला गोड असला तरी, आजच्या 'पाकीट संस्कृतीत' हे शुद्ध 'दैव दुर्लभ'च!
ज्यांना खरेच परिवर्तन हवे, ते आपल्यालाच निवडतील, हा आशावाद म्हणजे रखरखत्या उन्हात मृगजळ शोधण्यासारखे आहे. उलट, तुमच्या या 'आदर्शवादी' प्रयोगामुळे मतविभागणी होऊन, ज्यांना सत्तेपासून दूर ठेवायचे आहे, तेच लोक बिनबोभाट आणि कमी खर्चात निवडून येतील, याचीच भीती जास्त वाटते.
अर्थात, आदर्शवाद नसावा असे आमचे म्हणणे नाही, पण हा प्रयोग म्हणजे 'सागरात खसखस' शोधण्यासारखा आहे. तरीही, या धाडसी (की भाबड्या?) प्रयत्नास आमच्या शुभेच्छा!
बिनपैशाच्या या लढाईत समोरच्या तगड्या उमेदवारांचे काम सोपे होणार आहे. आदर्शवादाच्या गप्पा मारताना, ज्यांना सत्तेत येऊ द्यायचे नाही, त्यांनाच आपण रेड-कार्पेट अंथरुण देतोय याचे भान असू द्यावे.
शेवटी काय, तर राजकारणाच्या या गढूळ सागरात तुमची ही आदर्शवादाची 'खसखस' सापडली तर नवलच! बाकी 'बिन पैशाचा तमाशा' बघायला जनता उत्सुक आहेच.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै डेबूजी
79728 81440
0 Comments