गावठाणासह अन्य जागा उपलब्ध असतानाही घरकुलाचे बांधकाम पाडल्याने रोष; उपसरपंचांसह विद्यमान सदस्यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार
अमळगाव तालुका अमळनेर येथे आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामावरून मोठा वाद पेटला असून, या विकासकामावर आता स्थानिक राजकारणाचे सावट निर्माण झाले आहे. गावात गावठाणासह इतर अनेक शासकीय जागा उपलब्ध असतानाही, एका हक्काच्या घरकुलाचे बांधकाम बुलडोझर लावून तोडण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह चक्क उपसरपंचांनीच कायदेशीर हरकत घेतल्याने अमळगावातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळगाव येथे आमदार निधीतून सभागृहाचे बांधकाम मंजूर झाले आहे. कोणत्याही सार्वजनिक विकासकामाचे ग्रामस्थांकडून स्वागतच होते, मात्र या सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या जागेवरून आता गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. गावात अनेक ठिकाणी हक्काची शासकीय व गावठाण जागा उपलब्ध आहे. असे असतानाही, एका कुटुंबाच्या घरकुलाचे बांधकाम पाडून त्याच जागेवर सभागृह उभारण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आल्याचा आरोप होत आहे. घरकुलावर बुलडोझर फिरल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाला आता प्रशासकीय आणि राजकीय वळण मिळाले आहे. अमळगावचे उपसरपंच जयेश मगन कोळी यांनी या संशयास्पद जागेच्या निवडीला तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, हे सभागृह ग्रामपंचायतीच्या अधिकृत जागेवर न करता एका खाजगी जागेवर केले जात असल्याचा खळबळजनक दावा उपसरपंचांनी केला आहे.
या संदर्भात उपसरपंच जयेश कोळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी (BDO) आणि सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे. ग्रामपंचायतीची हक्काची जागा सोडून खाजगी जागेवर शासकीय निधीचा वापर का केला जात आहे? असा सवाल त्यांनी आपल्या तक्रारीत उपस्थित केला आहे.
सरपंच आणि सदस्यांच्या भूमिकेकडे लक्ष!
दुसरीकडे, एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेत या बेकायदेशीर कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एका बाजूला उपसरपंच आणि सदस्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय यंत्रणा, यामुळे गावात अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.
सध्या या वादग्रस्त जागेवर सुरू असलेल्या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या संपूर्ण वादावर गावाचे प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच आणि अन्य सत्ताधारी सदस्य काय भूमिका घेतात, ते या जागेच्या बदल्यात दुसरी जागा सुचवणार की प्रशासनाच्या निर्णयाचे समर्थन करणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
उद्या वाचा सविस्तर वृत्त...
या जागेच्या वादामागे नक्की कोणाचे अर्थकारण आणि राजकारण दडले आहे? घरकुल पाडण्यामागे प्रशासनाचा हेतू काय?
पाहा आमचे 'विशेष वृत्त' उद्याच्या अंकात!
- धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments