आमदारांसह सर्वांची ​'तळमळ' फक्त पॅनल बांधण्याची आणि तोडफोडीची!

शेतकी संघाच्या मूळ उद्देशाला राजकीय हरताळ...!!
​तालुका शेतकी संघ... ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आणि कृषी व्यवस्थेचा ‘अत्यंत महत्त्वाचा कणा’ (असे अलीकडे फक्त पुस्तकात आणि भाषणात ऐकायला मिळते!). शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबावी, खते-बियाणे योग्य दरात मिळावीत, आणि हमीभावाने खरेदी व्हावी, या पवित्र उद्देशाने या संघाची स्थापना झाली होती. पण सध्या तालुक्यातील चित्र पाहिले, तर या मूळ उद्देशाला "सत्तेच्या राजकारणाचे" कीड लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.
​गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात प्रचंड पळापळ, बैठका, आणि गुप्त खलबते सुरू आहेत. पण कसली? शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळवून देण्याची? की गोदाम तारण कर्ज योजना राबवण्याची? छे, छे... अजिबात नाही! ही पळापळ सुरू आहे ती फक्त आणि फक्त 'पॅनल' बांधण्याची आणि समोरच्याचे पॅनल 'तोडण्याची'.
आमदार अनिल भाईदास पाटील व अन्य पॅनल च्या​नेत्यांना विसर पडलेले 'पाच' कडू सत्य...
 निवडणुक लागल्या पासून ते आज चिन्ह मिळे पर्यंतच्या रणधुमाळीत आमदार अनिल पाटील व कोणत्याही नेत्याच्या किंवा भावी संचालकाच्या तोंडून खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक चकार शब्दही बाहेर पडलेला नाही:
१))​खते-बियाणे आणि अवजारे: शेतकऱ्यांना वेळेवर आणि वाजवी दरात रासायनिक-सेंद्रिय खते मिळतात का? आधुनिक शेती अवजारे भाडेतत्त्वावर देण्याची योजना कागदावरून जमिनीवर कधी उतरणार? यावर बोलायला कुणाकडेही वेळ नाही.
२)​मध्यस्थांचे उच्चाटन आणि पारदर्शक वजन: दलाल आणि व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक कशी थांबवायची, आणि वजनात होणारी मापमारी कशी रोखायची, या गंभीर विषयावर एकाही पुढाऱ्याने तोंड उघडलेले नाही.
३)​गोदामे आणि तारण कर्ज योजना: बाजारपेठेत मंदी असताना शेतकऱ्यांचा माल सुरक्षित राहावा आणि त्यांना 'माल तारण कर्ज' मिळावे, जेणेकरून त्यांना माल स्वस्तात विकावा लागणार नाही; या मूळ सुविधेचा संघाला पूर्ण विसर पडलेला दिसतोय.
४)​प्रक्रिया उद्योग: स्थानिक पातळीवर तेलगिरणी, डाळ मिल किंवा प्रक्रिया उद्योग सुरू करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा विचार तर नेत्यांच्या स्वप्नातही येत नसावा.
५)​पारदर्शक कारभार आणि लाभांश: संघाचे वार्षिक ऑडिट, सभासदांची वार्षिक सभा आणि त्यांना मिळणारा लाभांश (Dividend) यावर बोलण्याऐवजी, "आमच्या पॅनलला मत का द्यायचे?" यावरच अवाजवी चर्चा सुरू आहे.
​आमदारांचे मौन आणि 'अळीमिळी गुपचिळी'
​सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे, तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांनाही शेतकी संघाला 'चांगले दिवस' कसे येतील, यावर बोलायला अजिबात रस नाही. शेतकी संघाचा मुख्य हेतू "नफा कमवणे नसून शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासणे" हा आहे, याचे भान बहुदा राजकारण्यांना राहिलेले नाही.
​शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांसाठी चालवलेला हा संघ आता "नेत्यांनी, नेत्यांच्या पुनर्वसनासाठी" चालवलेला आखाडा बनला आहे. गेल्या १५ दिवसांतील पळापळ, फोडाफोडीचे राजकारण आणि सत्तेची ऊब मिळवण्यासाठी चाललेली धडपड पाहता, शेतकऱ्यांच्या हिताचा 'कणा' असणारा हा संघ स्वतःच राजकीय उपचारांच्या प्रतीक्षेत आहे, हे मात्र नक्की!
​आता शेतकरी राजा विचारतोय—"पॅनल तर बांधले आमदारसाहेब, पण आमच्या तुटलेल्या संसाराचे आणि शेतीचे काय?" यावर उत्तर देण्याचे धाडस आमदार अनिल पाटील, खासदार स्मिताताई किंवा त्यांचे विरोधक दाखवतील का, हाच खरा प्रश्न आहे.
~~~~~~~~~~~~
उद्या वाचा....
आमदारांना शेतकी संघ फक्त आपल्या माणसांसाठी 'बसा-उठायला जागा' पाहिजे म्हणून हवे!
~~~~~~~~
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments