पुरस्कार की स्वतःचे पैसे मोजून घेतलेली मानहानी?

आम्ही नाकारले असे पुरस्कार! 
तुम्ही देखील नाकारा!
विशेष म्हणजे अशा बातम्या देखील करु नका!
दिल्ली, मुंबई, चेन्नई, इंदोर, नासिक अशा अनेक ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा होत असतो,
आधी पैसे भरा, स्व खर्चाने पोहोचा, स्वतःचे खर्च करून निवास करा वा त्यांनी आयोजित टेंट मध्ये कुडकुडत मुक्काम करा. दिल्ली मुंबई दौरा होतोय हे समाधान बाळगून परिवारासह मस्त टूर होते हा एकमेव फायदा वगळता पुरस्कार च्या नावाखाली लायनीत उभे राहून पत्रवाळी स्वीकारल्या सारखे प्रमाणपत्र व ट्रॉफी पदरात पाडून घ्या..!
देशभरातुन हजारो आलेले असतात ना!


या साठी आपलेच पैसे घेऊन प्रोफेशनल फोटोग्राफर नेमलेले असतात त्यांचे कडून फोटो विकत घ्या किंवा आपला मोबाईल वाला सोबत न्या !
परत आल्यावर मस्त बातम्या करा..
काही छापतातही, आरत्याही म्हणतात, लिहितातच.. त्यांना दिल्ली मुंबई जाऊन आल्याचे समाधान, बातमी आली की लाईक शेअर अभिनंदन करणारे 'अंगठा' घेऊन तयार असतातच!
असाच पुरस्कार माझे प्राध्यापक असलेल्या मैत्रिणीला एका पर प्रांतातील एका ठिकाणी मिळाला होता,
आम्ही दोघे त्या साठी पोचलो होतो..
तिने 4000 रुपये भरले होते, लॉज व राहायचा खर्च आमचा म्हणणे 'तीचा!'
आल्यावर ती बातमी करणे क्रमप्राप्त होते, केली!अनेकांनी माझे प्रेमापोटी प्रसिद्ध देखील केली.
पण दरम्यान मला
'आपण उत्कृष्ट लेखन करून समाजात जागृती करत असल्याने आपणास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, नासिक मुक्कामी या.'
त्या साठी 1500 रुपये नोंदणी शुल्क पाठवा असे सांगण्यात आले होते.
मी असे पुरस्कार विकत घेत नाही, आपला पुरस्कार सविनय नाकारत आहे असे कळविले... याची बातमी सकाळचे तत्कालीन अमळनेर प्रतिनिधी डीगंबर उर्फ राजू महालेसर देशदूत ला संजय कृष्णा पाटील यांनी ठळक प्रसिद्ध केली.

थोडक्यात कुणास आपल्या कामा बद्दल पुरस्कार द्यायचा असेल तर आपण केलेल्या कामांची यादी बायोडाटा वगैरे का द्यावा? पैसे का भरावे? स्वतःचा खर्च करून प्रमाणपत्र व किरकोळ ट्रॉफी (आपल्याच खर्चाने?) का स्वीकारावी,?
नकोत असले पुरस्कार,... आणि जे अशा पुरस्काराने सन्मानित(?) झालेत त्यांचाही अनुभव वाईट असतोच.. पण मी फसलोय हे सांगण्या ऐवजी आरत्या म्हणवून घेणे जास्त सोपे असते.
मी पुरस्कार सविनय नव्हे तर खरमरीत उत्तर देऊन नाकारला ती दै.सकाळ व देशदूतला आलेली बातमी माझे मैत्रिणीने तेथून आल्यावर वाचली आणि खजील झाली. म्हटली... आधी मला सांगितले असते तर मी कशाला इतका खर्च केला असता?
मी म्हटले... तुझे समाधान व्हावे म्हणून!
आजही ती तितकीच खजील आहे, पण पैसे भरून का असेना माझे मैत्रिणीला पुरस्कार घेताना माझा 'छोटासा' के बी 10 कॅमेरा चांगले क्लिक करणारा ठरला! पत्रकार मित्र असल्याने फ़ोटोसह बातम्या देखील आल्या, हे अलाहिदा !
तात्पर्य हे की विकत पुरस्कार घेऊ नका, समाजात चुकीचा संदेश जातो, ज्यांना खरेच आपली कदर असेल तर त्यांनी स्वतः दखल घ्यावी, खर्च मागू नये.
असा रांगेत उभे राहून पुरस्कार मिळाला तर त्याचे महत्त्व राहत नाही. 
आणि ज्यांना आपल्या कामाप्रति आदर असेल त्यांनी दिलेला गुलाबाचा देखील जरूर स्वागत करावा. 
नाहीतरी वर्षोनुवर्षे पुरस्कार विकत देणारे देतच राहतील व आपण बातम्या प्रसूत करीत राहू.
निदान आपला मित्र आहे म्हणून अंगठा 👍🏽 दाखवायला आपले काय जाते?
कुणाला दुखविणे हा हेतू नाही पण वास्तवाचे भान यायला हवे हे अपेक्षा असल्याने हा प्रपंच!!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापु सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments