जुन्या घरातून नव्या घरात,
गाव खेड्यातून शहरात, पाटीदार धाब्याच्या घरातून बंगल्यात... असे स्थलांतरीत झालेत.. अनेकांचा पत्ता बदललाय आता...माझा देखील!!
तरी इथे मन मात्र रमत नाही... अद्याप तरी...! होईल कदाचित सवय... परिवर्तन संसार का नियम है म्हणत रुळेल... किंवा त्या आधी रुळावरून माझी गाडी घसरलेही,...
पण,
मी जिथे 1982 पासून अगदीच 26 जानेवारी 25 पर्यंत रहात होतो तिथली आठवण प्रकर्षाने येतेय...
केवळ एक व्यक्ती जाऊ शकते अशा बोळीतून जावे लागले 26 जानेवारी 25 पर्यंत! आजही जाताच लोक... मोजून 40 फूट लांबी अन एकटी व्यक्ती जाऊ शकेल इतकी रुंदी! गल्ली पण इतकी अरुंद नव्याने आलेली व्यक्ती म्हणतात की वाहन कसे ने-आण करतात..?
वाहने अरुंद रस्त्यावर आली की तू आधी रिव्हर्स घे म्हणत आपण वाद पाहतो तसे या देशमुख वाड्यातील बोळीत समोरा समोर कुणी आले तर मात्र कुणीतरी एक आपसूक वया नुसार आदर देऊन मागे पाय घ्यायचा!
'गल्लीतील मुले मात्र आपसात भिडायची.. मिच आधी आलोय बघ 4 पाऊले मी पुढे आहे म्हणून !'
वाद व्हायचे पण त्यातही मजा असायची.. ट्रॅफिक हवालदार सारखे आम्ही कुणीतरी त्यांच्यातील वाद मोडत असू..
मध्येच गाय वासरू आले तर 'आम्हा या हवालदारांची देखील तारेवरची कसरत असायची.'
झोपडी वजा घर पण मज्जा होती.. पावसाशी असलेली माझी मैत्री याच घरात तुटली, पाऊस आला की बसायला उठायला जागा नसे..
तरी सारे परस्पर सुखदुःख समजून घेत सर्व धावत असत..
अगदी काल कुणाशी भांडण झाले असले तरी तोच सकाळी नुसते आपले घरात भांडे पडले तरी धावून यायचा... काय झाले? कुणी पडले का?
गंमत वाटे हे पाहून.. काल तर हे जीवावर उठले होते आणि आज काही संकट आले का म्हणून धावून का आले?
गल्लीतून किरकोळ वस्तूच काय अनेकदा बाहेरगावी जाताना कपडे, हंडे, बादल्या, पाण्याची मोटर वा अनेक किमती वस्तू राहून जात, पण आपलीच वस्तू म्हणून शेजारी जतन करायचे..
बाहेर जातांना चावी शेजारच्या व्यक्तीकडे सोपवली जायची..
एकदा तर घरात चक्क गॅस सुरू आहे पाणी तापायला ठेवलेले.. आम्ही घरापासून 10 किलोमीटर गेलेलो.. बाईसाहेब यांना आठवण येताच शेजारी फोन केला.. काम झाले,
असे कुणीही कुणाचे घरात निर्धास्त जाऊन सेवाभाव बजावत. बजावतात...
आम्हाला साडेचार 5 महिने झाले घर बदलून पण आजही माझे जुन्या घराची चावी शेजारील बारी यांचे कडेच आहे.
इतरांची देखील सर्वांची अशीच सोय असते..
किरकोळ वाद विवाद झाले तरी क्षणात मदतीला धावून जाणाऱ्या गल्लीत रहायला इतकी वर्षे मिळाली याचा अभिमान वाटतो.
गळके घर आणि अनेक प्रश्न तरी ते सुख नव्या घरात नाही..
असेच सर्व गल्लीत वा गाव खेड्यात होते, हेच सुख प्लॉट/बंगला/ फ्लॅट मध्ये मिळायला हवे म्हणून एका नव्या चळवळीची सुरुवात व्हायला हवी.
नेहमी असलेली बंद दारे उघडली पाहिजेत, आवाज येताच धावले पाहिजे. सर्वच गल्ली / गावातून बंगल्यात स्थिरावलेले आहेत.. त्यांनी तिथेही मनाची दारे उघडली पाहिजेत.
मग चोर कॉलनीत येऊ शकणार नाहीत, पहारेकरी ठेवायची गरज नाही, घरी कुणी असो नसो एकटेपणा जाणवणार नाही, सतत भेटी गाठीं, गप्पा गोष्टी झाल्या की परस्पर स्नेह भाव वाढेल, मानसिक शांतता लाभेल व दवाखाने कमी होतील,
एक दुसऱ्या कडील भाजी, चटणी ची अदला बदल जिभेचे चोचले पुरविते असे नाही तर परस्पर प्रेमाचा ओलावा या देवाण घेवाणीत येत जात असतो..
आपली गल्ली / कॉलनी आपला एक परिवार आहे असे समजून सर्वांच्या मनात भावनेचा/प्रेमाचा पूर येईल तो सुदिन! अशा सुसज्ज सर्वच वसाहतीत जुन्या घराचे वातावरण निर्माण व्हावे ही अपेक्षा.
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440


0 Comments