अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल उद्या दि.21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, ती अनेक नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. विशेषतः, माजी मंत्री आमदार अनिलदादा पाटील आणि शिरीषदादा चौधरी यांच्यासाठी हा निकाल निर्णायक ठरणार आहे.
या निवडणुकीत एकीकडे शिवसेना (शिंदे गट) व शहर विकास आघाडी दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. शहर विकास आघाडीसाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार अनिलदादा पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबरावदादा पाटील, विनोदभैय्या पाटील यांच्यासह अनेक माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, 4 डझन आजी माजी नगरसेवक आणि राजकीय धुरीणांनी शहर विकास आघाडीच्या बाजूने कंबर कसली होती. या दिग्गजांच्या विरोधात शिरीषदादा चौधरी यांनी एकहाती किल्ला लढवला. विशेष म्हणजे, त्यांच्यावर नंदुरबार व शहादा येथील जबाबदारी देखील होती, तरीही त्यांनी अमळनेरमध्ये आपले पूर्ण बळ लावले.
अमळनेर येथील निवडणुकीत शिरीषदादा चौधरी आणि आमदार अनिलदादा पाटील या दोघांचे अस्तित्व पणास लागले आहे. नगराध्यक्षपदी डॉ. परीक्षित बाविस्कर (शिंदे सेना) विजयी झाल्यास, शिंदे सेनेची ताकद वाढेल आणि शिरीषदादा चौधरी यांचे दमदार 'कमबॅक' होईल, जे अनिल पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याउलट, शहर विकास आघाडीचे जितेंद्र ठाकूर विजयी झाल्यास, शिरीषदादा चौधरी यांचे येथील राजकारण संपुष्टात आल्याचे मानले जाईल, असे राजकीय धुरीणांचे मत आहे.
उद्या एक वाजेपर्यंत या दोघांचा राजकीय फैसला होणे अपेक्षित असून, दोन्ही गटांनी विजयाचा दावा केलेला आहे. १८ प्रभागातून ३६ पैकी कोण किती जागा जिंकेल, अपक्ष किती जागी विजयी होतील याबाबत फारसे गांभीर्य दिसत नसून, 'नगराध्यक्ष कुणाचा?' हीच चर्चा जोरदार आहे.
ऐतिहासिक विजयाची शक्यता
उद्या शिंदे शिवसेनेची सरशी झाली, तर अनेक दिग्गज लोकांच्या विरोधात एकट्या शिरीषदादा यांनी एकहाती मिळवलेला हा दैदिप्यमान विजय मानला जाईल. याउलट, शहर विकास आघाडीला यश मिळाले, तर अनेकांच्या विरोधातील लढ्यात एकट्या शिरीषदादा चौधरी यांच्या एकाकी संघर्षाची कथा मात्र अनेक वर्षे चर्चेत राहील.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै. डेबूजी
79728 81440
लोकहितवादी बातम्या मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा..https://whatsapp.com/channel/0029VbB85Q0Fy72FcComA20H
0 Comments