बहुचर्चित खाशि मंडळ निवडणूक: आज मतदान! उद्या फैसला!

अनेक प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी, लखपती, करोडपती देखील होते 'पाकीट' घेण्यासाठी रांगेत!!
विद्यमान संचालक भ्रष्ट असल्याचा आरोप करून परिवर्तन पॅनल व अपक्ष उमेदवारांनी आशिर्वाद पॅनलच्या उमेदवारांवर टीकेची झोड उठवली. मतदारांना हे अपील मान्य होईल का? हे 5 जानेवारीच्या निकालातून स्पष्ट होईलच. 
पाकिटे व खाशि हे समीकरण असलेल्या या निवडणुकीत काल दिवसभर जास्तीत जास्त पाकिटे मिळावी म्हणून मतदारांची धावपळ रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यात चारित्र्य, नीतिमत्ता, न्यायाचे धडे देणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, व्यापारी, राजकीय नेते, लखपती, करोडपती देखील लाईन लावताना दिसून आले.
बाहेरगावी राहणाऱ्या अनेक मतदारांना आणण्या - नेण्यासाठी विशेष सोय व निवास व्यवस्थेसह मेजवानीसाठी एक खास टीम दिमतीला होती. 
आशीर्वाद पॅनल ने निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच जोरदार आघाडी घेतली होती तर उशिरा शहाणपण सुचलेल्या परिवर्तन पॅनल ने मात्र कमी वेळात आशीर्वाद पुढे आव्हान उभे करण्यात यश मिळविले. मात्र सूत्रबद्ध प्रचार, मोठा खर्च करण्याची मानसिकता, मतदारांची खडा-न-खडा माहिती, वर्षोनुवर्षे मतदारांशी जोडून ठेवलेले संबंध याचा परिणाम म्हणून आशीर्वाद पॅनलचे पारडे आजही जडच वाटत आहे. 
तरीही शेवटच्या क्षणी जनशक्ती जनशक्ती करणाऱ्या परिवर्तनच्या काही व अपक्ष उमेदवारांनी मोठी पाकिटे काढून हात खुला केल्याने  आशिर्वादच्या 3 लोकांची घरवापसी निश्चित असल्याचा खाशी राजकारणातील मुरब्बी लोकांचा होरा आहे.
अखेर कोण मारणार बाजी? 
परिवर्तन, आशीर्वाद की अपक्ष मारणार मुसंडी? बजरंग अग्रवाल, कुंदनलाल अग्रवाल, प्रकाश मुंदडा, विनोदभैय्या पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील या खाशि श्रेष्टींची प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्या दुपारपर्यंत फैसला होणार आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440
*ब्लॉग मधील प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.

Post a Comment

0 Comments