मारवड विकास मंच व मिल के चलो अभियान कडून
डॉ.कलाम विज्ञान संशोधन परीक्षेत प्रवीण विद्यार्थ्यांना मिळाली संधी!
मोठ्या पदावर असूनही गावाशी नाळ न तोडता विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी झटणारे अधिकारी आजही आहेत, याचा प्रत्यय अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आला आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे नागपूरचे आयकर आयुक्त संदीप साळुंखे आणि आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिकचे सहआयुक्त कपिल पवार हे अशाच मोजक्या अधिकाऱ्यांपैकी आहेत. त्यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम साकार झाला आहे.
मारवड व परिसर विकास मंच तसेच ‘मिल के चलो’ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यातील २० आणि धरणगाव तालुक्यातील १ अशा एकूण २१ शाळांमध्ये घेण्यात आलेल्या डॉ. अब्दुल कलाम विज्ञान संशोधन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच दोन दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती.
या सहलीत २१ शाळांमधून प्रत्येकी तीन विद्यार्थी आणि एक शिक्षक सहभागी झाले होते. एकूण २६ विद्यार्थी, ३१ विद्यार्थिनी, २१ शिक्षक व ४ शिक्षिका असा सहभाग होता.
सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी वेरूळ येथील लेण्यांना भेट देत एकाच दगडातून वरून खाली कोरलेल्या कैलास लेणीचे अद्भुत शिल्पकौशल्य प्रत्यक्ष अनुभवले. छत्रपती संभाजीनगर येथील बेलराईज कंपनीला भेट देऊन आधुनिक उद्योगविश्वाची ओळख करून घेतली. बीबीका मकबरा येथे मुघलकालीन इतिहासाची माहिती मिळाली, तर सिद्धार्थ गार्डनमधील निसर्गसौंदर्य, देवगिरी किल्ल्याचा गौरवशाली इतिहास आणि भद्रा मारुती मंदिर दर्शनाचाही सहलीत समावेश होता.
या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वात मोलाची भर पडली असून जिज्ञासा, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही सहल आयुष्यातील पहिलीच अनुभवसमृद्ध आणि अविस्मरणीय शैक्षणिक सहल ठरली.
संपूर्ण खर्च मारवड व परिसर विकास मंचच्या वतीने करण्यात आला. याआधी दिवाळीपूर्वी अमळनेर तालुक्यातील २० शाळांमध्ये डॉ. अब्दुल कलाम विज्ञान संशोधन परीक्षा घेण्यात आली होती. प्रत्येक शाळेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना या सहलीचा लाभ देण्यात आला.
या उपक्रमामागे नागपूरचे आयकर आयुक्त संदीप साळुंखे (मारवड) आणि आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिकचे सहआयुक्त कपिल पवार (पातोंडा) यांची प्रेरणादायी भूमिका आहे. त्यांच्या संकल्पनेतून ‘मिल के चलो’ अभियानाचे संचालक अनिरुद्ध पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांमध्ये दर महिन्याला डॉ. अब्दुल कलाम फिरती प्रयोगशाळा विनामूल्य विज्ञान प्रयोग दाखवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
सहल यशस्वी होण्यासाठी देवेंद्र साळुंखे, महेश पाटील, विनायक पाटील, अतुल सैंदाणे, चेतन वैराळे व अशोक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच डी. ए. धनगर, उमेश काटे, निरंजन पेंढारे, भारती बहिरम आणि अनिता बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments