जि.प.​निवडणूक लांबणीवर पडताच 'भावी' नेत्यांच्या 'छत्र्या' पुन्हा बंद!

हौशे, नवशे, गवशे झाले 'नॉट रिचेबल'; जि.प.-प.स. निवडणूक अनिश्चिततेचा फटका
​ 'खर्च नको, अन् पायपीट नको' म्हणत काढता पाय !!
नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकां संपताच आता जिप/पसचा बिगुल वाजेल असे वातावरण तयार होताच, जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समितीच्या (प.स.) आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, आता आरक्षणाचा मुद्दा आणि आगामी परीक्षांचा काळ यामुळे निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने, या 'सीझनल' पुढाऱ्यांचा उत्साह मावळला आहे. 
पावसाळ्यात जसे बेडूक बाहेर येतात, तसे निवडणुकीच्या वासाने बाहेर आलेले हे उमेदवार आता पुन्हा गायब झाले असून, त्यांनी आपापल्या 'छत्र्या' गुंडाळल्याचे चित्र अमळनेर तालुक्यासह जिल्हाभर पाहायला मिळत आहे. अर्थात याला काही सन्माननीय अपवाद देखील आहेत हे अलाहिदा!
​गेल्या काही दिवसांपासून जि.प. आणि प.स. निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. हे पाहून अनेक वर्षं मतदारसंघात न फिरकणाऱ्या इच्छुकांनी अचानक जनसंपर्क वाढवला होता. गाठीभेटी, हळदीकुंकू समारंभ, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि कोपऱ्या-कोपऱ्यावरील उद्घाटने यांना उधाण आले होते. मात्र  "दादा, ताई, अक्का" करत मतदारांच्या दारात जाणारी पावले आता अचानक थंडावली आहेत.
​नेमके कारण काय?
निवडणुकीतील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा न्यायालयात गेला असून, कोर्टाने सुनावणीची तारीख पुढे ढकलली आहे. दुसरीकडे, फेब्रुवारीनंतर दहावी-बारावी आणि इतर शालेय परीक्षांचा (मार्च-एप्रिल) हंगाम सुरू होत आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस बळ परीक्षांमध्ये व्यस्त राहणार असल्याने, मे महिन्यापर्यंत निवडणुका होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
​खर्च आणि पायपीटीला लावली कात्री
निवडणूक जवळ आली असे समजून ज्यांनी बैनरबाजी आणि जेवणावळींवर खर्च करण्यास सुरुवात केली होती, त्यांना आता आर्थिक गणिते बिघडण्याची भीती वाटू लागली आहे. "अजून निवडणूक लांब आहे, आतापासून खर्च करून काय उपयोग?" असा विचार करत अनेकांनी आपला हात आखडता घेतला आहे. जे उमेदवार रोज सकाळी मतदारांच्या संपर्कात दिसत होते, ते आता पुन्हा अदृश्य झाले आहेत. ​मतदारांमध्येही या 'कामापुरता मामा' वृत्तीच्या नेत्यांबद्दल उपहासात्मक चर्चा रंगली आहे. "पाऊस पडल्यावर जशा छत्र्या उघडतात, तसे इलेक्शन जवळ आल्यावर हे नेते उगवतात आणि तारीख लांबली की छत्र्या बंद करून गायब होतात," अशी खमंग चर्चा कट्ट्याकट्ट्यावर ऐकायला मिळत आहे.
​एकंदरीत, जोपर्यंत निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होत नाही, तोपर्यंत तरी अमळनेरकर आणि ग्रामीण भागातील जनतेला या 'भावी' नेत्यांचे दर्शन दुर्लभच होणार, हे मात्र नक्की!
​"कामापुरते सक्रिय"
निवडणूक लांबल्याचे समजताच इच्छुकांचा 'जनसेवा' करण्याचा उत्साह अचानक कमी झाला आहे. मतदारांना गृहीत धरून केवळ स्वार्थासाठी आणि कामापुरते सक्रिय होणाऱ्या या धोरणामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. आता पुन्हा हे बेडूक थेट निवडणुकीच्या पावसाळ्यातच डराव-डराव करताना दिसतील, अशी हसत हसत मल्लिनाथी नागरिक करीत आहेत.
*अनेकदा बातमीत प्रसिद्ध फोटो हे प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments