अमळनेर शहरातील गलवाडे रोड, मुंदडा इस्टेट परिसरासह संपूर्ण शहरात सध्या डीजे चालकांचा स्वैर कारभार सुरू आहे. कधीकाळी डीजे बंदीच्या भीतीने "आम्ही उपाशी मरू" म्हणत रडणारे आणि लोकप्रतिनिधींपासून पत्रकारांपर्यंत सर्वांचे निवेदन घेऊन पाय धरणारे डीजे चालक आज सर्व नियम धाब्यावर बसवून मोकाट सुटले आहेत.
रात्री १२-१२ वाजेपर्यंत 'आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ ...' अशा कर्कश आवाजी‘नंगानाचामुळे’ विद्यार्थी, रुग्ण आणि वृद्ध नागरिक हैराण झाले असून, आता थेट प्रशासकीय व्यवस्थेच्या डोळ्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
डीजे चालकांनी जेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी पाय धरले होते...
काही काळापूर्वी जेव्हा डीजेवर कडक बंदी आली होती, तेव्हा याच डीजे व्यावसायिकांनी शहरात दारोदारी फिरून निवेदने दिली होती. "डीजे बंद झाला तर आमची कुटुंबे उद्ध्वस्त होतील," अशी आर्त हाक देत त्यांनी राजकीय नेते, अधिकारी आणि पत्रकारांचे पाय धरले होते. आज कायद्याची अंमलबजावणी शिथिल होताच हे चालक ‘ते’ दिवस विसरले आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वेळेचे आणि आवाजाचे कोणतेही बंधन न पाळता, केवळ स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरण्याचे काम हे व्यावसायिक करत आहेत.
मुंदडा इस्टेट परिसरातील मंगल कार्यालय परिसरात तर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. विशेष म्हणजे, या परिसरात अर्धा डझन वरिष्ठ अधिकारी (DySP, तहसीलदार, PSI) वास्तव्यास आहेत. अधिकाऱ्यांच्या घराशेजारीच जर नियमांची पायमल्ली होत असेल, तर शहराच्या इतर भागांत काय अवस्था असेल? "आंधळदळतं कुत्रं पीठ खातंय" या म्हणीप्रमाणे प्रशासन डोळे मिटून हा प्रकार पाहत आहे का?
कोणाचे काय हाल?
विद्यार्थी: परीक्षांच्या काळात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या आवाजामुळे अभ्यासात व्यत्यय.
रुग्ण आणि वृद्ध: कर्णकर्कश आवाजामुळे हृदयविकाराचा त्रास आणि झोप न होण्याच्या तक्रारी.
कामगार वर्ग: दिवसभर कष्ट करून आल्यावर रात्रीची शांतता हिरावली गेल्याने संताप.
"डीजे चालकांनी लक्षात ठेवावे, जर नागरिक चिडले आणि त्यांनी आंदोलन उभारून डीजे बंदी साठी एल्गार पुकारला तर पुन्हा एकदा तुम्हाला पदर पसरून दारोदारी निवेदने घेऊन रडण्याची वेळ येईल. म्हणून जनतेचा संयम सुटण्याआधी स्वतःहून मर्यादा पाळा असा इशारा शहरातील त्रस्त नागरिकानी दिला आहे.
प्रशासनालाही शेवटचा इशारा
मुंदडा इस्टेटसह शहरातील सर्वच मंगल कार्यालयांना दिलेल्या परवानग्यांचा हिशेब प्रशासनाकडे आहे का? डेसिबल मीटरने आवाज का मोजला जात नाही? १० वाजेनंतर गुन्हा दाखल का केला जात नाही? जर तात्काळ ही 'ध्वनी दहशत' थांबली नाही, तर माहिती अधिकार अर्ज, वरिष्ठ स्तरावरील तक्रारी आणि थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आमचा सवाल: ज्या पत्रकारांनी आणि नेत्यांनी तुमच्या पोटाच्या प्रश्नासाठी साथ दिली, त्यांच्याच शब्दाला तुम्ही आज केराची टोपली दाखवत आहात का? पोट भरा पण अतिरेक करू नका. लक्षात ठेवा, कायदा सर्वांसाठी समान आहे!
या विषयावरील व्हिडीओ पाहण्यासाठी 'पत्रकार धनंजय सोनार' चॅनेल जरूर सर्च करा. विषय आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करायला विसरू नका.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments