​नगराध्यक्ष 'बाहुले' झालेत, मग तुम्ही काय 'मोकाट' सोडणार का?

आ. अनिलदादा पाटील यांना जनमानसाचा कानोसा घेवून जाहीर सवाल; 
अमळनेरच्या राजकारणात 'कलगीतुरा' मे हिट पेक्षा पाण्याचे निमित्त साधून आमदार तापवताहेत वातावरण!!
​अमळनेर "नगराध्यक्ष हे माजी आमदार शिरीषदादा यांचे बाहुले बनले आहेत," अशी बोचरी टीका करणाऱ्या आमदार अनिलदादा पाटील यांना आता जनतेतून आणि राजकीय वर्तुळातून थेट सवाल विचारले जाऊ लागले आहेत. (तो लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परिक्षीत बाविस्कर यांचा अपमान देखील आहे.) 
पाणी प्रश्नावर 'हल्लाबोल' करताना आमदारांनी स्वतःच्या सक्षमतेचा जो दावा केला, त्यावर आता सडेतोड टिप्पणी केली जात आहे. अनिल पाटील यांच्या पत्नी नगराध्यक्ष असताना जनतेचे पाण्यासाठी हाल लोकांनी पाहिले आहेत... म्हणजे नपच्या परीक्षेत ते नापासच झाले आहेत..
​सत्ता पालटली तरी चित्र बदलणार का?
​दादा, जर नगराध्यक्ष बाहुले झाले आहेत असं आपण म्हणता, तर मग उद्या मारून-मुटकून सत्तासूत्रे तुमच्या हातात आली, तर तुम्ही तरी काय 'मोकाट' सोडणार आहात का? सत्ता पालटली तर फार काही बदलणार नाही; फक्त फाईलींचा प्रवास 'स्टेशन रोड'ऐवजी 'धुळे रोड'कडे सुरू होईल आणि ठेकेदारांच्या रांगा 'इंदुमाई निवास'ऐवजी तुमच्या बंगल्यावर दिसू लागतील! 
खरे तर या फाईली आपल्याकडेच  याव्यात, यासाठीच हा सगळा आटापिटा सुरू आहे, हे आता जनताही ओळखून आहे.
​मंत्रीपद असूनही ठोस कामाचा दुष्काळ!
​पाणी प्रश्नावर तर आपण न बोललेलेच बरे. राज्याच्या मंत्रीपदावर असूनही अमळनेरसाठी 'हे काम अनिलदादांनी केलं' असं अभिमानाने सांगण्यासारखं एकही ठोस काम अद्याप झालेलं नाही. १२३ मधील व्यापारी संकुलावर असलेल्या शॉपिंगपेक्षाही मोठ्या नावाच्या पाटीशिवाय, आमदार म्हणून छातीठोकपणे सांगता येईल असं एकही भरीव काम तुमच्या कारकीर्दीत दिसत नाही, अशी चर्चा सध्या शहरात आहे.
​'बोलबच्चन' इमेज बदला!
​तुम्ही उत्कृष्ट वक्ते आहात, भाषणं लई भारी देता, पण आता लोक तुम्हाला प्रेमाने 'बोल बच्चन अमिताभ बच्चन' किंवा 'बातो की दुकान' म्हणू लागले आहेत. दादा, केवळ शब्दांची आतषबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाकडे लक्ष देण्याची हीच वेळ आहे. तालुक्याचं सर्वात मोठं पद तुमच्याकडे आहे, त्याला न्याय द्या. असा काही वारसा निर्माण करा की लोक तुमची वर्षानुवर्षे आठवण काढतील.
​घोरपडेंची टीका आणि जनतेचा सूर
​काँग्रेस नेते संदीप घोरपडे यांनी तुमच्यावर अत्यंत चपखल शब्दांत टीका केली आहे. जे घोरपडे बोलत आहेत, तेच आज अनेक सामान्य नागरिकही बोलताना दिसत आहेत. (घोरपडे नेमके काय म्हणाले? हे उद्या खास त्यांच्याच शब्दांत ब्लॉगवर प्रसिद्ध होईल...)
​आमचा सल्ला:
येऊन-जाऊन शिरीष चौधरींचा द्वेष, जळगावचा जप आणि नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांच्यावर टीका करून नपची सत्ता ओढण्याचा प्रयत्न आता सोडून द्या. आमदार म्हणून आपली कारकीर्द 'अजरामर' कशी होईल, यासाठी प्रयत्न करा. हीच अमळनेरकरांची माफक अपेक्षा आहे!
- लोकहितवादी पत्रकार 
धनंजय बापू सोनार
७९७२८८१४४०
(ब्लॉग मधील प्रसिद्ध फोटो प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.)

Post a Comment

0 Comments